नवी मुंबई : जीव्हीके कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस एक व एटीसी टॉवरचा आराखडा बनविण्याचे काम झहा हदीद आर्किटेक्ट (झा) कंपनीला देण्यात आले आहे. झा ही विश्वविख्यात कंपनी असून त्यांनी बीजिंगमधील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडाही बनविला आहे.नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २०२२ पर्यंत विमानतळाचा दुसरा टप्पाही पूर्ण होवून देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ तयार झालेले असेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे सिडकोसह विमानतळाचे बांधकाम करणाऱ्या जीव्हीके कंपनीनेही विमानतळाच्या बांधकामाला गती दिली आहे. टर्मिनस एक व एटीसी टॉवरचे आराखडे तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. १२ आठवड्यांच्या स्पर्धेतून आराखडे बनविण्यासाठी झा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. लंडनमधील झहा हदीद आर्किटेक्ट ही विश्वभर प्रसिद्ध कंपनी आहे. १९७९ पासून त्यांनी अनेक विश्वप्रसिद्ध वास्तू व प्रकल्पांचे आराखडे तयार केले आहेत. ४४ देशांमधील जवळपास १५० मोठे प्रकल्प त्यांनी तयार केले आहेत. यामध्ये ७ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाºया बीजिंगमधील न्यू डॅक्सिंग विमानतळाच्या आराखड्याचाही समावेश आहे. लंडनमधील आॅलिंपिक दर्जाचे जलतरण केंद्र, बाकूमधील हैदर अलीव सेंटर, रोममधील मॅक्सी कला केंद्र, चीनमधील ग्वांगझो ओपेरा हाऊस, कतारमधील २०२२ च्या विश्वचषकासाठीच्या स्टेडियमचे आराखडे झा कंपनीने केली आहे.जीव्हीके व एनएनआयएएलचे अध्यक्ष डॉ. जी. व्ही.के. रेड्डी यांनी झा कंपनीच्या नियुक्तीविषयी माहिती प्रसिद्धिपत्राद्वारे दिली आहे. नवी मुंबई विमानतळाची रचना हे डिझाईन, इंजिनियरिंंगमध्ये लँडमार्क ठरले पाहिजे हे व्हिजन असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळ आराखड्यासाठी ‘झा’ची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:43 AM