नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले दिवंगत गोपाळ वसंत सैंदाणे यांना पोलिस अधिकारी व्हायचे होते. त्यानुसार त्यांनी अभ्यासही सुरू केला होता. विशेष म्हणजे सहायक आयुक्तपदाची परीक्षाही दिली होती. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कर्तव्य बजावत असताना भंगारमाफियांच्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. मामाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांच्या जितेंद्र पंढरीनाथ सोनवणे या भाचाने पूर्ण केले आहे. अथक परिश्रम घेऊन पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्याने आपल्या दिवगंत मामाला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
शहीद गोपाळ सैंदाणे हे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. २००७ मध्ये ऐरोलीतील पॉवर हाऊसमध्ये ते कर्तव्य बजावत असताना काही भंगारमाफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना वीरमरण आले होते. दिवंगत सैंदाणे यांना पोलिस अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी तयारीसुद्धा केली होती. मात्र, अकाली निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.
पोलिस अधिकारी होण्याचे आपल्या मामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितेंद्र सोनवणे याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात दररोज आठ तास अभ्यास करून बी. ई.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमपीएससीमार्फत होणारी परीक्षा देण्यासाठी तयारी केली. त्यानुसार पनवेल येथील आंबेडकर भवनमध्ये दररोज आठ ते दहा तास अभ्यास करून २०२२मध्ये त्याने पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली.
या परीक्षेचा गेल्या बुधवारी निकाल जाहीर झाला असून, जितेंद्र सोनावणे हा एसटी संवर्गातून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अभियांत्रिकी विभागाची पदवी असतानाही केवळ दिवंगत मामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पोलिस अधिकारी झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय खान्देश महासंघाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर यांनी जितेंद्र याच्या घरी जाऊन या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.