उरण : ग्रामसुधारणा मंडळ सावरखार तर्फे न्हावा-शेवा बिजनेस पार्क (डिपी वर्ल्ड ) आणि जेएनपीए सेझच्या विरोधात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील, रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी (१३) भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.न्याय मिळाला नाही तर सेझ प्रशासना विरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील सावरखार गावच्या जमिनी जेएनपीए, न्हावा-शेवा बिजनेस पार्क ( डिपी वर्ल्ड) जेएनपीए सेझच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित करण्यात आल्या आहेत.७० टक्क्यांहून अधिक जमिनी या सावरखार ग्रामस्थांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक भूमीपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी कवडीमोल मोबदल्यात शेतकऱ्यांकडून संपादन केल्या आहेत. जमीन संपादनावेळी प्रकल्पग्रस्तांना स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीवर घेण्याचे आश्वासन सेझ प्रशासनाने दिले होते. मात्र स्थानिक भूमीपुत्रांना,प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले नाही. मात्र परप्रांतीयांची भरती करून स्थानिक भूमीपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सेझने केले आहे.
तसेच सावरखार ग्रामस्थांना कोणत्याही निर्णयात विश्वासात घेत नसल्याने तसेच सेझ प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही सावरखार ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसुधारणा मंडळ सावरखारच्या पुढाकाराने जेएनपीए,न्हावा शेवा बिजनेस पार्क (डिपी वर्ल्ड) सेझ विरोधात सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनाला कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेएनपीटीचे विद्यमान विश्वस्त रविंद्र पाटील, जेएनपीएचे माजी विश्वस्त भूषण पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिपक ठाकूर, कामगार नेते रोशन ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किरिट पाटील, लंकेश ठाकूर, आदित्य घरत आदिंनी या उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांना न्याय मिळाला नाही तर सेझ प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही कामगार नेते महेंद्र घरत यांनी यावेळी दिला आहे.