जेएनपीटी-आम्रमार्ग अखेर दृष्टिपथात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:55 AM2017-11-07T02:55:20+5:302017-11-07T02:55:26+5:30
शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया पामबीच मार्गाच्या निर्मितीनंतर सिडकोने आता दुसºया सागरी मार्गाच्या उभारणीसाठी कंबर कसली आहे.
कमलाकर कांबळ
नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया पामबीच मार्गाच्या निर्मितीनंतर सिडकोने आता दुसºया सागरी मार्गाच्या उभारणीसाठी कंबर कसली आहे. हा मार्ग जेएनपीटी ते आम्रमार्गावरून पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. सुमारे १0.७ किमी लांबीच्या या प्रस्तावित मार्गामुळे जेएनपीटीकडे जाणाºया मार्गावरील वाहतूककोंडीला आळा बसणार आहे.
नवी मुंबई हे शहर खाडी किनारी वसले आहे. सध्या रस्ते वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त ताण पाहता भविष्यात सागरी मार्गांना महत्त्व प्राप्त होणार आहे. ही बाब ओळखून सिडकोने आवश्यक तेथे सागरी मार्गाचे नियोजन केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक ठरणाºया आम्रमार्ग जंक्शन ते शिवाजीनगर हा ५.८ किमी लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे,तर शिवाजीनगर ते जेएनपीटी हा ३.७ किमी लांबीचा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ६२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार आराखडा व विकास करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. पुढील ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. एकूणच २0२१ पर्यंत या सागरी मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानुसार विमानतळाला उपयुक्त ठरणारी दळवळण यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचे काम सुध्दा प्रगतिपथावर आहे. सिडकोचा नवा सागरी मार्ग ट्रान्स-हार्बर मार्गाला जोडला जाणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग-४बी आणि राज्य महामार्ग-५४ या दोन महामार्गाला हा प्रस्तावित मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे जेएनपीटीकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेने वाशी ते उलवे दरम्यान नवीन उन्नत सागरी मार्ग प्रस्तावित केला आहे. हा मार्ग सिडकोच्या नव्या सागरी मार्गाला जोडला जाणार आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने रस्ते वाहतुकीचा एक उत्तम व जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
सिडकोचा दुसरा
सागरी मार्ग
सागरी मार्गाची भविष्यकालीन गरज लक्षात घेवून सिडकोने यापूर्वी वाशी ते बेलापूर दरम्यान १३ किमी लांबीचा पामबीच मार्ग तयार केला आहे. हा मार्ग शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे. त्यानंतर आता सिडकोने जेएनपीटी ते आम्रमार्ग हा १0.७ किमी लांबीच्या दुसºया सागरी मार्गाचे काम हाती घेतले आहे.