उरण : जेएनपीटी कामगारांना मागील २० वर्षांपासून देण्यात आलेली सुमारे ३१ कोटींची घरभाडे भत्त्याची रक्कम लेखापरीक्षकांनी अतिरिक्त ठरविली आहे. कामगारांना घरभाड्यापोटी अदा करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांंच्या रकमेच्या वसुलीसाठी जेएनपीटीने कामगारांंच्या ओव्हर टाइम आणि वेतनातून कापण्याचा आदेश काढले आहेत. जेएनपीटी प्रशासनाच्या आदेशाने कामगार संतप्त झाले आहेत. बेकायदेशीर असलेला आदेश त्वरित मागे न घेतल्यास ५ आॅगस्टपासून संपाचा इशारा येथील विविध कामगार संघटनांनी जेएनपीटीला दिला आहे.
जेएनपीटी मागील २० वर्षांपासून कामगारांना ओव्हर टाइम, डीए, घरभाडे आदी भत्ते देत आली आहे. वसाहतीमध्ये किंवा वसाहती बाहेर राहणाऱ्या कामगारांनाही जून १९९९ पर्यंत घरभाडे भत्ता दिला जात होते. मात्र, जून १९९९ रोजी कामगारांना देण्यात येणारा घरभाडे भत्ता अतिरिक्त ठरवत लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणाºया कामगारांना देण्यात येणारा ओव्हर टाइम भत्त्यामधील घरभाडे भत्ता बंद करण्यात आला. त्यानंतर आॅक्टोबर २००२ रोजी लेखापरीक्षकांनी पुन्हा हरकत घेऊन इतर कामगारांनाही दिला जाणारा ओव्हर टाइम भत्त्यामधील घरभाडे भत्ता बेकायदेशीर असून तो त्वरित बंद करावा, असे आदेश दिले होते. जेएनपीटी प्रशासनाने लेखापरीक्षकांना नोंदविण्यात आलेली हरकत मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जेएनपीटीची विनंती लेखापरीक्षकांनी धुडकावून लावली. त्यामुळे हरकत तशीच कायम राहिली. जेएनपीटी प्रशासनानेही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत शिपिंग मंत्रालयाची मान्यता न घेतल्याने हरकत तशीच कायम राहिली. कायम राहिलेली सदर हरकत कॅगकडे गेल्यामुळे ती संसदेत सादर करण्यात आली. शिपिंग मंत्रालयाने २५ जून २०१९ रोजी जेएनपीटीला निर्देश देत कामगारांना दिला जाणारा ओव्हर टाइम भत्त्यामधील घरभाडे भत्ता त्वरित बंंद करून कामगारांंना अदा करण्यात आलेली ३१ कोटी ५ लाखांची रक्कम वसुली कामगारांच्या पगारातून करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर जेएनपीटीनेही कामगारांना २० वर्षांपासून अदा करण्यात आलेले अतिरिक्त ३१ कोटी पाच लाख घरभाडे भत्त्यांंची रक्कम वसूल करण्यासाठी परिपत्रक काढले आहे. जेएनपीटीने १५ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकमध्ये कामगारांना घरभाडे भत्त्यांंपोटी अदा करण्यात आलेली रक्कम वेतनामधून वळती करण्यात येईल, असे परिपत्रकामध्ये म्हटले आहे.
कामगारांना घरभाड्यापोटी अदा केलेल्या कोट्यवधी रुपयांंच्या रकमेच्या वसुलीसाठी जेएनपीटीने कामगारांंच्या वेतनातून कापण्याच्या आदेशानंतर कामगार संतप्त झाले आहेत. या अन्यायाविरोधात जेएनपीटी बंदरातील सर्वच कामगार संघटना एकवटल्या आहेत. यापैकी जेएनपीटी एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पाटील आदी मान्यता प्राप्त कामगार संघटनेने जेएनपीटी प्रशासनाच्या या बेकायदेशीर कृ तीविरोधात लेखी पत्र देऊन निषेध नोंदवला आहे.कामगारांना आंदोलन करता येणार नाही - ढवळेजेएनपीटी कामगारांना या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा संप करता येणार नसल्याची प्रतिक्रिया जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक जयंत ढवळे यांनी व्यक्त केली. प्रकरण कामगार आयुक्त आणि न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत ढवळे यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.