जेएनपीटी उभारणार मँग्रोज पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 02:49 AM2020-11-19T02:49:18+5:302020-11-19T02:49:24+5:30
पहिल्या टप्प्यात पाच कोटी खर्च
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उरणजवळील बेलपाडा येथील प्रशस्त जागेवर मँग्रोज पार्क विकसित करण्याचा निर्णय जेएनपीटी व्यवस्थापनाने घेतला आहे. दोन टप्प्यांत हे पार्क उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ हे पार्क विकसित करणार असल्याचे समजते.
देशातील सर्वात मोठे बंद म्हणून जेएनपीटीची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून या बंदराच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खारफुटीची तोड करण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांकडून वेळोवेळी केला जात आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन बंदरे व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. उरण आणि परिसरात विकास प्रकल्पांच्या नावाखाली खारफुटीची तोड केली जात असल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विभागाकडेही वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, जेएनपीटीने आपल्या चौथ्या बंदराच्या विस्तारासाठी तब्बल ४,५00 खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी जेएनपीटीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जानेवारी, २0१९ रोजी तत्कालीन कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती,
राज्य खारफुटी कक्षाची भूमिका सल्लागाराची
प्रस्तावित मँग्रोज पार्क प्रकल्पात राज्य खारफुटी कक्षाची भूमिका सल्लागाराची असेल, असे वन विभागाचे मुख्य संवर्धक वीरेंद्र तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. खारफुटी पार्क उभारण्याचा जेएनपीटी प्रशासनाचा प्रस्ताव स्तुत्य आहे. उशिरा का होईना, जेएनपीटला खारफुटी संवर्धनाचे महत्त्व पटले आहे, अशी प्रतिक्रिया नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन कुमार आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली आहे.