जेएनपीटी परिसर ठरतोय तस्करीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:34 PM2019-07-26T23:34:11+5:302019-07-26T23:34:38+5:30

दिल्ली पोलिसांनी पकडले हेरॉइन : रक्तचंदनासह सोने तस्करीच्या प्रकारात वाढ; सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची गरज

The JNPT campus is becoming the center of trafficking | जेएनपीटी परिसर ठरतोय तस्करीचे केंद्र

जेएनपीटी परिसर ठरतोय तस्करीचे केंद्र

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये विशेषत: जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल १३० किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्येही अमली पदार्थांची तस्करी वाढू लागली आहे. महाविद्यालयीन तरुणही अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. शहरातील उद्याने, मोकळ्या इमारतीमध्ये नशा करत असलेले तरुण बसलेले दृश्य दिसू लागले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून पाहावयास मिळत होते; परंतु आता एमडी पावडर, कोकेन, हेरॉइन या अमली पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरातून तब्बल १३० किलो अफगाण हेरॉइन जप्त केले असून, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत जवळपास १३०० कोटी असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे या परिसरातील तस्करीचे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात आहे हे उघड झाले आहे. आतापर्यंत जेएनपीटीच्या परिसरामध्ये रक्तचंदन व सोने तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. रक्तचंदनाचा मोठा साठा या परिसरातून नवी मुंबई पोलीस व सीमाशुल्क विभागानेही हस्तगत केला आहे. अनेक टोळ्या जेरबंद केल्या आहेत. एका वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोने तस्करीचे प्रकार सीमाशुल्क विभागाने व इतर तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत.

जेएनपीटी हे देशातील प्रमुख बंदरापैकी एक आहे. यामुळे समुद्रमार्गे तस्करीसाठी या परिसराचा वापर होत आहे. मसाल्याचे पदार्थ, भंगार व इतर वस्तूंच्या आडून अवैध व्यापार होत आहे. तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागासह इतर तपास यंत्रणा असल्या तरी नवी मुंबई पोलिसांची जबाबदारीही वाढू लागली आहे. अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथक तयार केले आहे; परंतु नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरासाठी एकच पथक आहे. त्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक व १२ कर्मचारी एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये होणाऱ्या कारवाईचे स्वरूप लक्षात घेता मनुष्यबळ खूपच कमी आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून अपेक्षित कारवाई होत नाही, यामुळे उरण व पनवेलमध्येही अमली पदार्थ विरोधी स्वतंत्र पथक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस स्टेशनकडूनही अमली पदार्थांचे सेवन व अवैध व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आयुक्तालय परिसरात प्रमुख तस्करीच्या घटना
२०११ - जेएनपीटीजवळ सीमाशुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन कोटी नऊ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले.
आॅगस्ट २०१३ - उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे ४२ टन रक्तचंदन जप्त केले.
मार्च २०१५ - मुंबई-गोवा महामार्गावर कल्ले गावाजवळ कंटेनरमध्ये ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त
डिसेंबर २०१७ - एसीच्या पार्टमधून ५० किलो सोन्यानी बिस्किटे लपवून आणली होती. सीमाशुल्क विभागाने सोने जप्त केले.
मार्च २०१८ - दुबईला पाठविण्यासाठी आणलेले सात टन रक्तचंदन जप्त करण्यात आले.
एप्रिल २०१९ - दुबईवरून आलेल्या भंगारामधून १९ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.

Web Title: The JNPT campus is becoming the center of trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.