उरण : जेएनपीटीच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदर प्रशासन (बीएमसीटी)ने १७ महिलांच्या नोकरभरतीसंदर्भात चर्चेसाठी बोलाविलेल्या बैठकीला जेएनपीटीचे चेअरमन नीरज बन्सल यांच्यासह तीनही टर्मिनलच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने सर्वपक्षीयांच्या वतीने जेएनपीटीचा निषेध करण्यात आला.रास्ता रोको आंदोलनानंतर जेएनपीटीने बुधवारी बैठकीचे आश्वासन दिले होते. आंदोलन निर्णायक वळणावर असताना केवळ आश्वासनावर सर्वपक्षीय नेत्यांनी परस्पर निर्णय घेऊन हे आंदोलन मागे घेतल्याने आधीच सर्वपक्षीय समितीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांची नाराजी होती, त्यामुळे बुधवारी होणाºया बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सर्वपक्षीय समितीकडून करण्यात येत आहे.चौथ्या बंदरात काम करणाºया एका प्रकल्पग्रस्त कामगाराला एका क्षुल्लक चुकीसाठी कामावरून कमी करून प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आकाश अनंत कोळी हा बीएमसीटीमध्ये आरटीजी, क्यूसी, आरएमजी आॅपरेटर म्हणून काम करत होता. कंटेनर डॅमेज केल्यामुळे त्याला मंगळवारी कामावरून काढून टाकले. सिंगापूर पोर्टमधील स्थानिक १०४ प्रकल्पग्रस्त कामगारांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीची भेट घेऊन या बडतर्फ कामगारासाठी संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. बैठकीला आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील, संतोष पवार, उरण उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील, पं.स. सभापती नरेश घरत, जेएनपीटीचे व्यवस्थापक जयवंत ढवळे, एसीपी विठ्ठल दामगुडे, पोलीस निरीक्षक चेतन काकडे उपस्थित होते.
जेएनपीटी अध्यक्षांसह टर्मिनलच्या सीईओंची बैठकीला दांडी; आंदोलन पेटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 5:28 AM