लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी अध्यक्षांनी मंगळवारी बोलाविलेल्या बैठकीला दांडी मारल्याने आणि फक्त १० प्रतिनिधी असतील तरच चर्चा करीन, अशी आडमुठेपणाची भूमिका उपाध्यक्षांनी घेतल्याने, संतप्त पालक संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पुढाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा जोरदार निषेध केला. ३ जुलैपर्यंत जेएनपीटी शाळेबाबतच्या विविध मागण्या सोडविण्यास दिरंगाई झाल्यास पुन्हा एकदा जेएनपीटी प्रशासन भवनाचे प्रवेशद्वार बंद करण्याचा इशारा दिला. जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या शाळेने भरमसाठ केलेली फीवाढ रद्द करावी, विद्यार्थ्यांना बंद केलेली बससेवा पूर्ववत करावी आणि इतर विविध मागण्यांसाठी संतप्त झालेले पालक, विद्यार्थ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली २३ जून रोजी जेएनपीटी प्रशासन भवनालाच तब्बल तीन तास घेराव घातला होता. शालेय पालक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार बैठकीसाठी तारखा देऊनही गैरहजर राहणाऱ्या जेएनपीटी चेअरमन अनिल डिग्गीकर आणि प्रशासनाचा निषेध करीत, जोरदार घेराव आंदोलनामुळे वठणीवर आलेल्या जेएनपीटी अधिकाऱ्यांनी निर्णय होईपर्यंत शाळेने फी न आकारण्याचे आणि मंगळवारी बैठक बोलाविण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती.जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर शालेय संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास पाटील, सेके्र टरी प्रमोद ठाकूर समितीचे अन्य पदाधिकारी, शिवसेना आ. मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, राजिप सदस्य विजय भोईर, शिवसेनेचे उरण पं. स. सदस्य दीपक ठाकूर आदी मान्यवर बैठकीसाठी उपस्थित होते. प्रशासन भवनातील कॉन्फरन्स हॉलमध्ये जेएनपीटी अध्यक्षांऐवजी व्यवस्थापक एन. के. कुलकर्णी हजर झाले. त्यांनी जेएनपीटी अध्यक्ष महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीत असल्याचे सांगितले. त्यामुळे उपाध्यक्ष निरल बन्सल बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, १० प्रतिनिधी असतील तरच बैठकीला उपस्थित राहून चर्चा करतील, असा निरोप आणल्यानंतर संतप्त झालेल्या शालेय समितीचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पुढाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा जोरदार निषेध केला. तसेच उपाध्यक्षांच्या वक्त व्यांचा समाचार घेत, शालेय पालक संघर्ष समितीने यापुढे जेएनपीटीबरोबर कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच येत्या ३ जुलैपर्यंत जेएनपीटी प्रशासनाने जेएनपीटी शाळेबाबतच्या विविध मागण्या सोडविण्यास दिरंगाई झाल्यास पुन्हा एकदा जेएनपीटी प्रशासन भवनाचे प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्वाणीचा इशाराही दिला.
जेएनपीटी अध्यक्षांची बैठकीला दांडी
By admin | Published: June 28, 2017 3:30 AM