जेएनपीटीने केले २७ हजार कोटींचे सामंजस्य करार; भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:46 PM2021-02-24T23:46:51+5:302021-02-24T23:47:01+5:30
भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण
उरण : २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (२४ फेब्रुवारी) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी २७००० कोटी रुपयांच्या ३० सामंजस्य करारांवर जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये डीपी वर्ल्ड, जे. एम. बक्शी ॲण्ड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआईटीआईई, एस.एस.जी. फार्मा प्रा.लि., सूरज ॲग्रो, जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा.लि., सिनलाइन इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा समावेश असून, त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअरहाउसिंग, कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी सेवा, फूड प्रोसेसिंग संबंधी सामंजस्य करार केले आहेत.
भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून मार्च २०२१ मध्ये ‘मेरिटाइम इंडिया समिट २०२१’चे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ मार्च २०२१ दरम्यान आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिखर संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एमआयएस २०२१’चे उद्घाटन करण्यात येणार असून केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांचे भाषण होईल.
संमेलनात २४ देश सहभागी होतील आणि ४०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन सादर होईल. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे पहिल्या सत्राचे - ‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’ - संयोजक असतील. उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भा.रा.से. हे ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील विशेष सत्राचे संयोजक असतील.
जेएनपीटी संपूर्ण जगभरात बंदर उद्योगासाठी दर्जेदार सेवेचा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी समर्पित असून निरंतर व्यापार वाढीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने बंदरातील कार्यक्षमता व वाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या गुंतवणूक केली आहे. ‘मेरिटाइम इंडिया समिट’मध्ये जेएनपीटीने विविध कंपन्यांसमवेत ३० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे जेएनपीटीला देशातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. जगभरात कोविड १९ चा परिणाम झाल्यानंतरही जेएनपीटीमध्ये २७ हजार कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. यामुळे रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील.
- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी