उरण : जेएनपीटीने आर्थिक २०१८ मध्ये कामगिरीत केलेली सुधारणा, कार्यक्षमतेत झालेली वाढ, एकूण सर्वच बाबतीत उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी राबवलेले नवनवीन उपक्रम आणि मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी पायाभूत सुविधेत केलेली वाढ यासाठी या वर्षाचा कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अॅवॉर्ड पटकावला. जेएनपीटीने मागील तीन-चार वर्षांत मालाची ने-आण सुलभ व्हावी, यासाठी सोयीस्कर अशी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. ज्याला आयात-निर्यातदाराकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जेएनपीटीच्या प्रभावी कार्यक्षमतेच्या मान्यताप्राप्त स्वतंत्र प्लॅटफॉर्मकडून नियमितपणे नोंदी घेतल्या जातात. या कामाची दखल घेऊन जेएनपीटीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.या वेळी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांना जेएनपीटी अधिक ग्राहकाभिमुख, तसेच कामकाजात अविरत होणारी वार्षिक प्रगती यासाठी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल इंडियन मेरीटाइम पर्सनॅलिटी आॅफ द इयर अॅवॉर्डने गौरवण्यात आले. बन्सल यांच्या कार्याला सन्मानित करण्यासाठी देण्यात आलेले हे तिसरे अॅवॉर्ड आहे.जेएनपीटीच्या वतीने कंटेनर पोर्ट आॅफ द इयर अॅवॉर्ड स्वीकारताना बन्सल म्हणाले की, हा अॅवॉर्ड टीमच्या एकत्रितरीत्या केलेल्या कामगिरीची ओळख असून जेएनपीटीने मागील काही वर्षांत अविरतपणे प्रगती साधण्यास यश मिळवले आहे, ज्याचा परिणाम म्हणून विविध उपक्रमाद्वारे पोर्टची सर्वागीण कार्यक्षमता वाढली असून, जागतिक दर्जाची सुविधा आयात-निर्यातदारांना देण्यात येत आहे.इंडियन मेरीटाइम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, नवीन कल्पना आणि प्रोत्साहन देण्यासाठी गेटवे अॅवॉर्डची निर्मिती करण्यात आली. गेटवे अॅवॉर्डच्या १० व्या पर्वात उत्कृष्ट कामगिरी, अपवादात्मक वैयक्तिक आणि संघटनात्मक यश दाखवण्यात आले.
जेएनपीटीने पटकावला कंटेनर पोर्ट आॅफ द इयर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:21 AM