जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक
By Admin | Published: January 6, 2017 05:21 AM2017-01-06T05:21:33+5:302017-01-06T05:21:33+5:30
डिजिटल, डीपीडी धोरणाविरोधात हजारो कामगारांनी निषेध व्यक्त करीत, जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक दिली. केंद्र सरकारने लागू केलेले कामगार विरोधी धोरण रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही
उरण : डिजिटल, डीपीडी धोरणाविरोधात हजारो कामगारांनी निषेध व्यक्त करीत, जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक दिली. केंद्र सरकारने लागू केलेले कामगार विरोधी धोरण रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही नोकरी व व्यवसाय बचाव आंदोलनकर्त्यांचे मार्गदर्शक माजी आमदार विवेक पाटील यांनी केंद्र सरकारला दिला.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे जेएनपीटी बंदर आणि परिसरातीलच शेकडो कंटेनरयार्ड, सीएफएसमध्ये काम करणाऱ्या सुमारे २५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याविरोधात सर्वपक्षीयांनी संघटित होऊन नोकरी व व्यवसाय बचाव आंदोलनकर्त्यांनी विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर हल्लाबोल आंदोलन केले.
करळ फाट्यावरून सुरू झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या कामगार संघटना, नागरिक आणि महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी कामगार विरोधी डिजिटल व डीपीडी धोरणाच्या नोटिफिकेशन कागदपत्रांची होळी करीत केंद्र सरकारचा धिक्कार केला.
कस्टम हाऊस जवळील पोर्ट युजर्स बिल्डिंगच्या समोरील ऐश्वर्य पार्किंगमधील प्रांगणात आंदोलनकर्त्यांची सभा झाली. सभेसाठी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख बी.एन.डाकी, कामगार नेते आमदार भाई जगताप, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, नरेंद्र पाटील, श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, भूषण पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, तुकाराम कडू तसेच विविध कामगार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोहर भोईर म्हणाले, सत्तेत असलो तरी जनतेचा आमदार म्हणून नागरिक, कामगार, कष्टकरी आणि सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कायम जनतेसोबतच राहील, अशी ग्वाही दिली. आंदोलनाला कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. तर माथाडी कामगार नेते गुलाब जगताप यांनी वेळ पडल्यास राज्यातील माथाडी कामगार संघटना सीएफएसचे कामकाज बंद पाडतील असा इशारा दिला. (वार्ताहर)