जेएनपीटी खासगीकरणास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:22 AM2018-07-20T01:22:20+5:302018-07-20T01:23:25+5:30
जेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला.
उरण : जेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला. जेएनपीटीच्या बंदराचा कंटेनर हाताळणीचा घसरता डोलारा सांभाळण्यासाठी कामगार आणि व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन संयुक्तरीत्या उपाययोजना करण्याचा निर्णय गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.
जेएनपीटीचा व्यवसाय २७ टक्क्यांनी घसरला आहे. जेएनपीटीची सातत्याने होणारी घसरण रोखण्यासाठी आॅपरेशन विभागाची एक शिफ्ट खासगीकरणातून चालविण्याचा निर्णय जेएनपीटीने घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जेएनपीटी व्यवस्थापनाने तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीसाठी जेएनपीटीच्या मान्यताप्राप्त संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, जेएनपीटी जनरल वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तथा कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील, न्हावा शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत, माजी कामगार ट्रस्टी तथा संघटनेचे सरचिटणीस भूषण पाटील आणि तिन्ही कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांसह जेएनपीटीचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. जेएनपीटी कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयाला तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात जोरदार विरोध दर्शविला. जेएनपीटीची पिछेहाट होण्यात सर्वस्वी व्यवस्थापनच जबाबदार असल्याचा आरोप करतानाच बंदरातील जाणविणाºया उणिवांचा पाढा व्यवस्थापनासमोर मांडला. ट्रॅक्टर, ट्रेलर्सची रोडावलेली संख्या, मेंटेनन्ससाठी लागणाºया स्पेअरपार्टची सातत्याने भासणारी उणीव, कामगार निवृत्त असतानाही मागील २५ वर्षांत न झालेली कामगार भरती, नव्या योजना राबविण्यास व्यवस्थापनाकडून होणारी दिरंगाई आदी जेएनपीटीच्या पिछेहाटीची कारणे ठरू लागल्याचा गंभीर आरोप कामगारांनी बैठकीतूनच केला.
व्यवस्थापनानेच कामगारांच्या काही उणिवांवर बोट ठेवत यापुढे कामगार आणि व्यवस्थापन यांनी एकत्रित येऊन जेएनपीटीच्या व्यवसायवाढीसाठी उपाययोजना करण्याचा निर्णय कामगार आणि जेएनपीटी अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेअंती घेण्यात आला. आजच्या बैठकीतील चर्चेत झालेला निर्णय संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.