कंटेनर पोर्टमध्ये जेएनपीटी २८ व्या क्रमांकावर; देशातील अव्वल बंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:34 PM2020-03-08T23:34:41+5:302020-03-08T23:34:57+5:30
सागरी उद्योग, व्यापाराला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प कार्यान्वित
मधुकर ठाकूर
उरण : ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत वाढत्या पायाभूत सुविधांमुळे जेएनपीटी बंदराचा कायापालट होत आहे. जेएनपीटीत पाच कंटेनर टर्मिनल्स असून जेएनपीटी देशातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लॉईड्सच्या अहवालानुसार जेएनपीटीचा जगभरातील पहिल्या १०० कंटेनर पोटर््सपैकी २८ वा क्रमांक असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.
जेएनपीटीने सागरी उद्योग आणि व्यापाराला चालना देण्यासाठी क्षमतावृद्धी करणारे व विविध सेवांमध्ये सुधारणा करणारे प्रकल्प सुरू केले आहेत. सध्या पोर्ट आॅफ सिंगापूर अॅथॉरिटी (पीएसए) च्या सहकार्याने चौथ्या टर्मिनल प्रकल्पाचे आठ हजार कोटींची गुंतवणूक करून काम सुरू केले आहे. यामध्ये १०० टक्के परदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याची क्षमता ही २.४ दशलक्ष टीईयूची (२४ लाख कंटेनर) असून त्याचे काम फेब्रुवारी २०१८ पासून सुरू झाले आहे. २०२२ पर्यंत बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामही पूर्णत्वास येणार आहे. त्या वेळी ही क्षमता वाढून १० दशलक्ष टीईयू (एक कोटी कंटेनर) पर्यंत पोहोचेल. बंदरातील नेव्हिगेशनल चॅनेलच्या ड्रेजिंगचे काम पूर्ण झाले असल्यामुळे अत्याधुनिक (१२,५०० टीईयूज पर्यंतच्या) जहाजांना बंदरामध्ये आणता येणार आहे.
जेएनपीटी-एसईझेडमध्ये फ्री ट्रेड वेअरहाउस झोन (एफटीडब्ल्यूझेड) विकसित करण्यात येत असल्याने व्यापाराबरोबरच साठवणूक आणि अन्य कामे करणे सोपे जाणार आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील जालना, वर्धा, नाशिक आणि सांगली येथे
ड्राय पोटर््सचा विकासही केला जात आहे.
जेएनपीटीतर्फे एकूण कार्गो वाहतुकीपैकी ४० टक्के वाहतूक ही महाराष्ट्रातील कंटेनर्सची असते. म्हणूनच मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी हब आणि स्पोक तत्त्वावर महाराष्ट्रात ड्राय पोर्ट्सचा विकास करण्यात येत असून यामुळे कार्गो क्लीअरन्स आणि एकत्रीकरण करणे सोपे जाणार आहे.
लिक्विड जेट्टीचा प्रकल्प प्रगतिपथावर
जेएनपीटीतर्फे वाढवण येथे २० मीटर खोली असलेल्या सॅटेलाइट बंदराचा विकास करण्यात येत असून हे बंदर ‘आॅल व्हेदर, आॅल कार्गो पोर्ट’असेल.
द्रव पदार्थांच्या वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेऊन जेएनपीटीने ३०९ कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रतिवर्षी ४.५ मी. टन क्षमतेच्या लिक्विड जेट्टीच्या विकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचबरोबर कोस्टल बर्थचा विकास केला जात असून त्यामुळे किनाºयावरील वाहतुकीला चालना मिळेल.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने व सौरऊर्जेची निर्मिती, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी तसेच घनकचºयावर प्रक्रिया करण्याची केंद्रे यासारखे अनेक उपक्रम जेएनपीटीच्या माध्यमातून सुरू केले आहेत. हरित बंदर बनून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
जेएनपीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले अनोख्या प्रकल्पांमुळे पुढील दशकात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. म्हणूनच जेएनपीटीच्या सेवेचा स्तर हा जगातील सर्वोत्कृष्ट बंदरांसमान ठेवून जागतिक स्तरावरील मागण्या पूर्ण करण्यावर जोर दिला जात आहे.
- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी