नवी मुंबई: आर्थिक राजधानी मुंबई आणि सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा या सागरी सेतूचे लोकार्पणानंतर सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात झटपट जाण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले जंक्शन येथे आंतरमार्गिकांचे काम सुरू असतानाच आता नॅशनला हायवे ॲथोरिटीनेही ही दोन्ही शहरे जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे. यानुसार जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहापदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामावर नॅशनला हायवे ॲथोरिटी सुमारे ३०१० कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे. या मार्गाचा पुण्यासह कर्जत-खोपोली परिसरालाही लाभ होणार आहे.
या नव्या हरित महामार्गाचा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे. सध्या या नव्या हरित महामार्गाची निविदा प्रक्रिया नॅशनला हायवे ॲथोरिटीने सुरू केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूच्या लोकार्पणानंतर भविष्यात कोकण हायवेमुळे गोवा राज्याचे अंतरही दोन तासांनी कमी होणार आहे. सध्या रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाचे काम विविध टप्प्यात सुरू केले असून यातील महत्त्वाचा टप्पा रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील पुलाचा आहे. तो झाल्यानंतर रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबाग ते मुंबई हे अंतर अवघ्या ४० मिनिटात गाठता येणार आहे.
चिर्ले येथेही सुरू आहे आंतरमार्गिकांचे कामतर अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच त्याला मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह जुन्या मुंबई पुणे हायवेला जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून चिर्ले येथे आंतरमार्गिकांच्या काम जोमाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जेएनपीए बंदरातून होणाऱ्या अवजड मल्टिएक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीमुळे हाेणारी वाहतूककोंडी आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्यासाठी चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पेफाटा ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत ७.३५ किलोमीटर लांबीचा असा एलिव्हेटेड कॉरिडॉर असून त्यावर १३५१.७३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
नव्या महामागार्वर असणार टोलमहाराष्ट्र शासनाकडूनही ही कामे सुरू असतानाच आता केंद्र शासनाच्या मालकीच्या नॅशनला हायवे ॲथोरिटीनेही मुंबई-पुणे दोन्ही शहरे जवळ आणण्यासाठी खासगीकरणातून जेएनपीटी नजिकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहा पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ३०१० कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग बांधून झाल्यानंतर संबधित कंत्राटदार त्याचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करणार आहे.