जेएनपीटी परिसराचा कायापालट होणार!
By admin | Published: August 25, 2015 01:00 AM2015-08-25T01:00:29+5:302015-08-25T01:00:29+5:30
देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटी परिसराच्या नियोजनावर सिडकोने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्या
नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटी परिसराच्या नियोजनावर सिडकोने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्या माध्यमातून परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. प्रत्यक्षात या कामाचा श्रीगणेशाही करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे.
जेएनपीटीचा विस्तार २५ कि.मी. क्षेत्रफळावर झाला आहे. या बंदराचा विस्तार करण्यासाठी चौथ्या टर्मिनल्सचे काम सध्या सुरू आहे. या बंदराच्या विस्ताराबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना आणि खोपटा या नवीन नगराचा विकास होत आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरातील पायाभूत सुविधा तसेच रस्ते वाहतुकीवर मोठा ताण पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जेएनपीटी परिसराचे आतापासूनच नियोजन करण्याचे योजिले आहे. त्यानुसार सिडकोत जेएनपीटी प्रभाव क्षेत्र हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाची जबाबदारी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. सरवदे यांनी मागील सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. जेएनपीटीशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या विविध प्रकारच्या दहा संस्था या परिसरात कार्यरत आहेत. यात ओएनजीसी, बीपीसीएल, नवी मुंबई पोलीस आदींचा समावेश आहे. या सर्व आस्थापनांत समन्वय साधून परस्पर सहकार्याने या परिसराचा विकास घडवून आणण्याची सिडकोची योजना आहे. त्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विकासाचे निर्धारित ध्येय गाठण्याची सिडकोची संकल्पना आहे.
जेएनपीटी प्रभाव क्षेत्रात एकूण तीस गावांचा समावेश आहे. या गावांचा सर्वसमावेश विकास घडवून आणण्यासाठी सिडकोने दत्तक योजनेचा पुरस्कार केला आहे. या परिसरात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक आस्थापनेने गाव दत्तक घेवून त्याचा विकास करावा, ही यामागची संकल्पना आहे. त्यानुसार स्वत: सिडकोने जासई हे गाव दत्तक घेतले आहे. गाव दत्तक योजनेचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. पहिल्या टप्प्यात सिडकोने या गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे. नंतर टप्प्याटप्प्याने रस्ते, उद्याने, सार्वजनिक तलाव, शाळा व आरोग्य केंद्रांचा विकास करणार आहे. जेएनपीटी परिसरातील इतर व्यवस्थापनाने एक-एक गाव दत्तक घेवून तेथे पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, त्या दृष्टीने संबंधितांशी समन्वय साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
जेएनपीटीत सध्या ४५ लाख कंटेनर येतात. पुढील सात-आठ वर्षांत या बंदराच्या विस्ताराचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे कंटेनरचा हा आकडा कोटीच्या घरात जाणार आहे.
भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून वर्षाला साधारण २0 ते २५ हजार कोटींची उलाढाल अपेक्षित धरली जात आहे. एकूणच पुढील काही वर्षांत जेएनपीटीला औद्योगिकदृष्ट्या अन्यन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांचे आतापासूनच नियोजन करणे क्रमप्राप्त झ्राले आहे. त्यानुसार सिडकोने पुढाकार घेतला असून त्यासाठी या परिसरात कार्यरत असलेल्या विविध आस्थापनांशी समन्वय साधला जात आहे.