जेएनपीटीच्या घसरणीमागे खासगीकरणाचा डाव ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:48 PM2019-05-12T23:48:57+5:302019-05-12T23:49:12+5:30

जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

JNPT's privatization behind the decline? | जेएनपीटीच्या घसरणीमागे खासगीकरणाचा डाव ?

जेएनपीटीच्या घसरणीमागे खासगीकरणाचा डाव ?

Next

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. जागतिक बंदरात २८ व्या स्थानावर असलेल्या जेएनपीटी बंदराचा घसरत्या व्यवसायाकडे केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालय आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामागे देशातील सर्वच बंदरात नफ्यात चालणाºया जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार आणि कामगार संघटनांकडून होऊ लागला आहे.
जेएनपीटी बंदर देशातील नफ्यात चालणारे एकमेव बंदर आहे. जेएनपीटी बंदराची उभारणी २६ मे १९८९ झाली. जेएनपीटी बंदराच्या निर्मितीनंतर या बंदरांतर्गत आतापर्यंत जीटीआय, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटीपीएल आदी चार बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. जेएनपीटीसह पाच बंदरातून कंटेनर आयात- निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. समुद्रमार्गे कंटेनर वाहतुकीचा धंदा तेजीत असल्याने त्यादृष्टीने जेएनपीटीकडून बंदराचा विकास केला जात आहे. बंदराच्या विकासासाठी अब्जावधी रुपये खर्चून विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. जेएनपीटीच्या विविध विकासकामांमुळे नुकतेच साडेबारा हजाराहून अधिक कंटेनर वाहून नेणारे सिंडी हे मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरात लँड झाले होते. जेएनपीटीच्या अशा या विविध कामांमुळे जेएनपीटी बंदर जागतिक बंदरात २८ व्या स्थानावर पोहोचले आहे.
जेएनपीटीला खासगी बंदरातून प्रत्येक कंटेनरमागे २४०० रुपये इतकी रॉयल्टी मिळते. जेएनपीटी वार्षिक कंटेनर हाताळणीची असो की नफ्याची आकडेवारी पाच बंदरे मिळून सांगत असते. या पाच बंदरात जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचे जेएनपीसीटी नावाचे पोर्ट आहे. मात्र स्वत:च्या मालकीचे बंदर अद्ययावत करण्यात जेएनपीटी प्रशासन स्वारस्य दाखवित नसल्याचा कामगारांचेम्हणणेआहे. जेएनपीटीच्या बंदरातच कंटेनर हाताळणीत होणारा विलंब आणि दिरंगाईमुळे शिपिंग कंपन्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळेआर्थिक नुकसान टाळण्यासाठी जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदराऐवजी शिपिंग कंपन्या जेएनपीटी बंदरात असलेल्या अन्य खासगी बंदराचा पर्याय निवडतात. जेएनपीटीच्या असहकारामुळे जेएनपीटीची कंटेनर हाताळणीची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
२०१७-१८ वर्षात जेएनपीसीटीने १४ लाख ८० हजार टीयूएस इतक्या कंटेनरची हाताळणी केली होती. तर
मागील वर्षाच्या तुलनेत जेएनपीसीटीची कंटेनर हाताळणी क्षमता २८.७१ टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात घसरली असून २०१८-१९ या आर्थिक वर्षात १० लाख ५६ हजार टीयूएस इतक्याच कंटेनरची हाताळणी करण्यात आली आहे.

संपाचा इशारा
जेएनपीसीटी बंदरात असलेल्या विविध क्रेन्सवर २४ तासांच्या कामांसाठी चार कामगारांऐवजी तीनच कामगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनपीटीच्या या निर्णयाविरोधात कामगार आणि कामगार संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटी कामगार संघटना आणि जेएनपीटी वर्कर्स युनियन या दोन कामगार संघटनांनी २४ मेपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.

दोन वर्षांपासून जेएनपीटीची कंटेनर हाताळणीत घसरण झाली आहे, हे खरे आहे. यावर उपाययोजना करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचे बंदर इतर अन्य बंदरांप्रमाणेच क्षमतेने कार्यान्वित होईल याकडेही लक्ष दिले जाईल. जेएनपीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा कामगार आणि कामगार संघटनांचा आरोपही चुकीचा आहे.
- जयंत ढवळे, मुख्य प्रबंधक, जेएनपीटी

Web Title: JNPT's privatization behind the decline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.