पनवेल : पैसे घेऊन नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज चौगुले असे आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला अटक केली असून, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एल अॅण्ड टी कंपनीमध्ये व्यवस्थापक व विजय चौगुले यांचा नातेवाईक असल्याचे सांगून मनोज चौगुले हा रोजगार मेळाव्याच्या फेसबुक पेजवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरायचा. त्यांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन त्यांचे दूरध्वनी क्रमांक मिळवायचा.पनवेलमधील एका महिलेला एल अॅण्ड टी कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध झाली आहे, या ठिकाणी आपले सिलेक्शन झाले आहे, तसेच आपले अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर आपल्याला तत्काळ याबाबत हजर व्हावे लागेल, असे सांगितले. मात्र, यासाठी कंपनीचा ड्रेस तयार करण्याचा असून ड्रेससाठी पाच हजार ५०० रुपये खात्यामध्ये भरल्यानंतर आपण हजर होताच चौथ्या दिवशीच पैसे परत रोख स्वरूपात दिले जातील, असे त्याने सांगितले. मात्र, कोणतीही नोकरी व पैसे परत न मिळाल्याने सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांद्वारे आरोपीचा माग काढून त्याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.>पनवेल पोलिसांचे नागरिकांना आवाहनपनवेल शहर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुण - तरुणींना गंडा घातला असल्याचे तपासात समोर येत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी आपल्याशी संपर्क साधून पैसे मागत असेल अथवा मागितले असतील तर सुजाण नागरिक बनून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.
नोकरीच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:21 AM