नवी मुंबई: विदेशात नोकरीच्या बहाण्याने पैसे उकळून तरुणांना इराण अथवा इतर देशात पाठवून शारीरिक पिळवणूक केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी फेब्रुवारी मध्ये सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता त्यामधील सूत्रधाराला सहकाऱ्यासह बुधवारी अटक करण्यात आली. यावेळी दोघांकडेही पिस्तूल मिळून आले आहेत.
दुबईसह इतर देशात चांगल्या नोकरीचे स्वप्न दाखवून इच्छुकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना विदेशात पाठवले जात होते. प्रत्यक्षात मात्र दुबई किंवा इतर देशात असलेले त्यांचे एजंट या तरुणांना इराण व इतर देशात नेवून अधिक श्रमाचे काम करून घेत होते. अशाच प्रकारे इराणमध्ये अडकलेल्या काही तरुणांनी स्वतःची सुटका करून घेऊन परत भारतात आल्यानंतर सीबीडी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये निरंजन देशमुख, संग्राम सोंडगे व पुस्कर सोनार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामधील निरंजन देशमुख हा बुधवारी सकाळी सीबीडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहायक निरीक्षक पराग लोंढे, उपनिरीक्षक विष्णू वाघ आदींच्या पथकाने सापळा रचला होता. त्यामध्ये निरंजन याच्यासह सुरेशकुमार चौधरी (३७) हा देखील पोलिसांच्या हाती लागला. दोघांनाही ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल व सात काडतूस मिळून आले. याप्रकरणी देखील त्यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या बहाण्याने भारतातील तरुणांना विविध देशात पाठवून त्यांच्याकडून कमी पगारात अधिक श्रमांचे काम करून घेणारी मानवी तस्करी टोळी चालवली जात होती. यामध्ये अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता असून सीबीडी पोलिस अधिक तपास करत आहेत.