बनावट मार्कशिटद्वारे घेतली नोकरीत बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:33 PM2020-02-26T23:33:51+5:302020-02-26T23:33:58+5:30
सिडकोतील प्रकार; गुन्हा दाखल
नवी मुंबई : सिडको कर्मचाऱ्याने बनावट मार्कशिट सादर करून नोकरीत बढती घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील सहा वर्षांपासून तो बढतीच्या नोकरीचा लाभ घेत होता.
राजेश अनंत पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. १९९७ साली तो सिडकोत सुरक्षारक्षक पदावर नोकरीला लागला होता. या नोकरीकरिता त्याने दहावी नापास असल्याचे गुणपत्रक सादर केले होते; परंतु २००९ मध्ये त्याने नोकरीत बढतीसाठी अर्ज करून दहावी व बारावी उत्तीर्ण असल्याचे शिक्षण मंडळाचे गुणपत्रक जोडले होते. त्याद्वारे २०१४ मध्ये त्याने नोकरीत बढती मिळवून लिपिक या पदाचा कार्यभार स्वीकारला होता; परंतु त्याने सादर केलेले गुणपत्रक बनावट असल्याची माहिती सिडकोला प्राप्त झाली होती. त्यानुसार सहायक विकास अधिकाºयामार्फत त्याच्या कागदपत्रांची चौकशी सुरू होती. यामध्ये राजेश पाटील याने बढतीसाठी सादर केलेले दोन्ही मार्कशिट बनावट असल्याचे आढळून आले. त्यासंबंधीचा अहवाल सिडकोमार्फत गुन्हे शाखा पोलिसांकडे सादर करण्यात आला होता. त्याद्वारे सीबीडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.