नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिका सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न २०१८ पासून प्रलंबीत होता. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा प्रश्न मार्गी लावला असून कर्मचाऱ्यांच्या १३ वारसांना लिपिक, टंकलेखक पदावर नोकरीत समावून घेण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधास २१ ऑगस्ट २०१७ मध्ये शासनाने मंजूरी दिली आहे. ३० मार्च २०२१ ला सेवाप्रवेश नियमावली तयार केली आहे. यामधील शैक्षणिक व तांत्रिक अहर्तेनुसार अनुकंपा तत्वावर नेाकरीसाठी प्राप्त अर्जांमधील क संवर्गातील १० व ड संवर्गातील १८ पात्र अर्जदारांचा प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला होता. मनपा अस्थापनेतील लिपीक व टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे त्या जागा रिक्त झाल्या होत्या. रिक्त झालेल्या जागेवर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियुक्ती झालेल्या १३ वारसांनी १९१८ मध्येच महानगरपालिकेकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. पाच वर्षांपासून प्रलंबीत असणारा विषय आयुक्तांनी सोडविला आहे. या निर्णयाचे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले आहे.
पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडविण्यात आला असून अनुकंपा तत्वावर १३ जणांना नोकरीत सामावून घेतले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबांना मदत होणार आहे. हे कर्मचारी त्यांच्या पदाला न्याय देतील - अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका