मुंबई : एमएमआरडीमार्फत उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड प्रकल्पावेळी बाधित झालेल्या सात कुटुंबांची फरफट अद्यापही थांबलेली नाही. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ वेळा या नागरिकांचे स्थलांतर झाल्यानंतरही त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नसल्याने हे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. एमएमआरडीएकडून पुनर्वसन होत नसल्याने प्रकल्पबाधितांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उभारताना पुलाखालील २२ झोपड्या बाधित झाल्या. यापैकी १३ झोपडीधारकांचे गोरेगाव येथील संतोष नगर येथे पुनर्वसन करण्यात आले. तर यामधील सात झोपडीधारकांना स्पार्क संस्थेने उभारलेल्या महर्षी कर्वे नगर संक्रमण शिबिरामध्ये घरे देण्यात आली. येथे घरासमोर तुंबलेली गटारे आणि त्यामध्येच महावितरणच्या केबल असल्याने हे रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.कांजूरमार्ग पूर्व हरियाली व्हिलेज येथे एमएमआरडीएमार्फत उभारण्यात आलेल्या इमारतींमध्येही या रहिवाशांना घर देण्यात आले नाही. पात्र असूनही या रहिवाशांची दखल एमएमआरडीएने अद्यापही घेतलेली नाही. स्पार्क संस्थेने या कुटुंबीयांचे योग्य पुनर्वसन करावे, असे पत्र दिल्यानंतरही एमएमआरडीए अधिकारी रहिवाशांना दाद देत नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.स्थानिक आमदार सुनील राऊत यांनीही प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली आहे. त्यानंतरही एमएमआरडीए दाद देत नसल्याने प्रकल्पबाधित कुटुंबीय आमरण उपोषण करतील, असा इशारा कांजूरमार्ग रेल्वे पुनर्वसन विस्थापित संघर्ष समितीचे सेक्रेटरी राजाराम रेणुसे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
जोगेश्वरी-विक्रोळी रोड प्रकल्पबाधितांची फरफट
By admin | Published: August 03, 2015 2:52 AM