फीवाढीविरोधात जेएनपीटी प्रशासनाला घेराव
By admin | Published: June 25, 2017 04:08 AM2017-06-25T04:08:29+5:302017-06-25T04:08:29+5:30
जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या शाळेने भरमसाठ फीवाढ रद्द करावी, बंद केलेली बससेवा सुरू करावी आणि इतर विविध मागण्यांसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या शाळेने भरमसाठ फीवाढ रद्द करावी, बंद केलेली बससेवा सुरू करावी आणि इतर विविध मागण्यांसाठी संतप्त झालेल्या पालक, विद्यार्थ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी प्रशासन भवनाला घेराव घातला. जेएनपीटी चेअरमन, प्रशासन अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीन तासांहून अधिक वेळ घेराव घातला. त्यामुळे प्रशासन भवनाचा मार्ग बंद झाल्याने अनेक कर्मचारी इमारतीच्या आत बाहेरच अडकून पडले.
शालेय पालक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार बैठकीसाठी तारखा देऊनही गैरहजर राहणाऱ्या जेएनपीटी चेअरमन अनिल डिग्गीकर आणि प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केल्याने अखेर जेएनपीटी प्रशासन वठणीवर आहे. यासंदर्भात मंगळवारी (२७ जून) बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये इंडियन एज्युकेशन संस्थेचे विद्यालय, महाविद्यालय आहे. या शाळेत सुमारे ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शाळेत गैरसोयी आहेत. बाहेरून सुसज्ज, सुंदर दिसणाऱ्या शाळेच्या इमारतीतील अनेक वर्गांच्या स्लॅबला गळती लागलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ आहेत. पाण्याच्या टाक्यात मेलेले बेडूक, पक्षी आढळून येत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बेंच निम्म्याहून अधिक मोडकळीस आले आहेत. शाळेत बंदर कामगारांची १५६ मुले वगळता उर्वरित विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यासाठी सुरू असलेल्या बसेस जेएनपीटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळेला सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. इमारत दुरुस्ती आणि शाळेला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी जेएनपीटी प्रशासनाची आहे. मात्र, त्याकडे जेएनपीटी प्रशासन सातत्याने दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप शालेय पालक संघर्ष समितीचा आहे.