पनवेलमध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम : मान्यवरांनी मांडले विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:07 AM2020-01-07T00:07:21+5:302020-01-07T00:07:30+5:30
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
पनवेल : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणजेच ६ जानेवारी, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, मुंबई ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवी पाटील, गणेश कडू, दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, वृषाली वाघमारे, अॅड. मनोज भुजबळ, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, काँग्रेसचे सुदाम पाटील, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान अभेद्य आहे. ब्रिटिश काळात दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावेळी उपविभागीय दत्तात्रय नवले यांनी दिली. तर दर्पण या नावातच सर्वकाही आहे, त्या काळातील पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून, मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहिती विनायक पात्रुडकर यांनी उपस्थितांना दिली.
कोकण शिक्षक मतदार संघांच्या पत्रकारांनी, आपली लेखणी अबाधित ठेवण्याचे काम मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये कायम ठेवल्याचे सांगितले.
पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचे मत प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. पत्रकारिता हे एक वेगळं रसायन असल्याचे विचार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.
>महापालिकेत कार्यक्रम
पनवेल महानगर पालिकेत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करीत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका मुख्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मराठी पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेचे बदललेले स्वरूप याबाबत आयुक्तांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संजय शिंदे आदी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.