पनवेल : पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. आजच्या काळात चौथ्या स्तंभाची भूमिका महत्त्वाची आहे. पत्रकार जे सांगतात, जे लिहितात त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे पत्रकार हा समाजाचे स्वास्थ्य जपतो, असे उद्गार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी काढले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्र मात ते बोलत होते.पनवेल येथील गोखले सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आरास सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, पनवेलच्या नगराध्यक्ष चारु शीला घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आदींसह पनवेल नगर परिषदेचे आजी-माजी नगरसेवक, पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आजच्या पत्रकारितेबद्दल उपस्थित मान्यवरांनी मते मांडली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असतात, असे सांगितले. माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी पत्रकारांनी प्रेस नोटची कॉपी पेस्ट न करता आपली प्रतिमा चांगली तयार केली पाहिजे, तसेच समाजातील पीडित लोकांच्या समस्या आपल्या लेखणीतून मांडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक पात्रुडकर यांनी जनमानस निर्माण करण्याचे काम मराठी पत्रकारितेने केले आहे. पत्रकाराचे जीवन समाजासाठी झटत राहणे आहे. त्यामुळे समाजासाठी जगणारा हा पत्रकार महत्त्वपूर्ण घटक आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्र माला संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कोळी, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पत्रकार समाजाचे स्वास्थ्य जपतो
By admin | Published: January 07, 2016 1:00 AM