शिवसेनेच्या निर्णयामुळे आघाडीत आनंदाचे वातावरण

By admin | Published: April 10, 2017 06:13 AM2017-04-10T06:13:52+5:302017-04-10T06:13:52+5:30

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला स्वबळावर लढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाजपासमोर शेकाप

The joy of the front of the Shiv Sena's decision is the joy of the environment | शिवसेनेच्या निर्णयामुळे आघाडीत आनंदाचे वातावरण

शिवसेनेच्या निर्णयामुळे आघाडीत आनंदाचे वातावरण

Next

मयूर तांबडे / पनवेल
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला स्वबळावर लढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाजपासमोर शेकाप आघाडी व शिवसेना या पक्षांना नमविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेना पनवेल महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याने मतविभाजनाचा फायदा शेकाप आघाडीला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेकाप आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
पनवेल महापलिकेची निवडणूक घोषित झालेली नसली तरीदेखील पनवेलमध्ये राजकीय खलबते सुरू झाली आहेत. भाजपासोबत आघाडी करायची की शेकापला साथ द्यायची, या विवंचनेत शिवसेना सापडली होती. पनवेलमध्ये भाजपा-शिवसेना युती होणार असे बोलले जात होते. मात्र, शनिवारी पनवेल येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन, मुंबई येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीत पनवेलमध्ये स्वबळावर निवडणुका लढवा, असे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या काळात पनवेलमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे स्वत: सभा घेणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. भाजपा व शिवसेनेची युती शेकाप आघाडीला टक्कर देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने दोन्ही पक्षांची ताकद विखुरली जाणार आहे. त्यामुळे त्याचा दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचा फायदा निश्चितच शेकाप आघाडीला होणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून पनवेलकर महापालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची वाट पाहत आहेत. शेकाप आघाडी महापालिकेची निवडणूक आताच घोषित करण्याची मागणी करत आहे तर भारतीय जनता पक्ष निवडणुका जून महिन्यात घेण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे निवडणुका कधी जाहीर होतात याकडे साऱ्याच पक्षांचे लक्ष आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मात्र विविध ठिकाणी फलकबाजी व प्रचारही सुरू केला आहे. शेकाप आघाडी विजयासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना तिकीट वाटपात आघाडीच्या पक्षांना किती जागा सोडायच्या हा यक्षप्रश्न आहे. तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने काही प्रभागात त्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. भाजपाकडे इच्छुकांची फार मोठी यादी आहे. शिवसेनेची ताकद शहरात व काही प्रमाणात ग्रामीण भागात आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविण्याच्या दृष्टीने त्यांना फार मोठी मजल मारायची आहे. २०१४ची पनवेल विधानसभा निवडणूक, तसेच २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली होती. मात्र, पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वासुदेव घरत यांना केवळ १७ हजार ९५३ मते मिळाली होती. तर २०१७ च्या पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला भोपळादेखील फोडता आलेला नाही. महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत मोठे कष्ट घ्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.
भाजपादेखील पनवेलमध्ये मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे स्वबळावर लढणाऱ्या भाजपाला कमी लेखून चालणार नाही. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ६ जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे भाजपा पनवेलमध्ये निवडणुका लढवण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, भाजपा व शेकाप आघाडी अशी तिरंगी लढत पनवेलमध्ये होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल.

भारतीय जनता पार्टी ही पनवेल महापालिकेची निवडणूक ताकदीने लढवणार आणि जिंकणार आहे. लोकसभा व राज्यसभेच्या निवडणुकीत मोदींवर विश्वास ठेवून नागरिकांनी जसे मतदान केले तसेच पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नागरिक मतदान करून भाजपाला विजयी करतील.
- प्रशांत ठाकूर, आमदार, भाजपा.

आमची ताकद आहे ती आहेच. आमचे मतदान आम्हाला होणारच आहे. भाजपा व शिवसेना पक्ष एकत्र व विरु द्ध लढल्याने आम्हाला त्याचा फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही. आमची आघाडी विजय मिळवणार आहे.
- विवेक पाटील,
माजी आमदार, शेकाप.

पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेना ७८ जागा लढवणार आहे. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे. भाजपासोबत युती होणार, असे कधीच म्हटले नव्हते.
- आदेश बांदेकर, शिवसेना, संपर्कप्रमुख.

Web Title: The joy of the front of the Shiv Sena's decision is the joy of the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.