अपघातांबाबत जनजागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर; वाहतूक पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:24 AM2021-01-30T01:24:03+5:302021-01-30T01:24:17+5:30
नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पनादेखील साकारली जात आहे
नवी मुंबई : वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाशी न्यायालयातील न्यायाधीशांनी रस्त्यावर उतरून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. अपघाताची व्याप्ती ही केवळ पीडित कुटुंबीयांनाच माहीत असते. त्यामुळे इतरांनाही त्याचे दूरचे परिमाण समजावून अपघात रोखण्याचे प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पनादेखील साकारली जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी वाशी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश तृप्ती देशमुख-नाईक यांच्यासह दिवाणी न्यायाधीशांनी यामध्ये सहभाग घेतला. बेलापूर येथील भाऊराव पाटील चौकात त्यांनी सिग्नलवर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांचे आभार मानले. तर, याच उद्देशाने न्याय व्यवस्था आणि पोलीस एकत्र येऊन रस्त्यावर उतरून जनजागृती करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पुरेपूर पालन केल्यास अनेक जीव वाचतील, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश डी. एम. पवार, ए. ए. मोतासे व एस. यु. जागृष्टे, वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते.