जुईनगर येथे लुटारूने तरुणीला रेल्वेतून ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:37 AM2017-12-04T04:37:05+5:302017-12-04T04:37:14+5:30
लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार जुईनगर रेल्वे स्थानकात घडला.
नवी मुंबई : लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेच्या डब्यात तरुणी एकटीच असल्याची संधी साधून तिला लुटण्याचा प्रयत्न करणाºया लुटारूसोबत झालेल्या झटापटीत हा प्रकार घडला आहे.
ऋतुजा बोडके (१९) हिच्यासोबत हा प्रकार घडला असून, ती बडोदा येथून पनवेलमार्गे रेल्वेने वाशीला येत होती. रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास रेल्वे नेरूळ स्थानकात आली असता, महिला डब्यात ती एकटीच असल्याची संधी साधून एका इसमाने महिला डब्यात प्रवेश केला. या वेळी त्या ठिकाणी रेल्वे पोलीसही कार्यरत नव्हते. यामुळे काही वेळानंतर त्याने ऋतुजाला लुटण्याच्या उद्देशाने धमकावत तिच्याकडील दोन मोबाइल व कानातले सोन्याचे झुमके खेचून घेतले. ऋतुजाने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने नेरूळ ते जुईनगर दरम्यान सुमारे तीन मिनिटे त्यांच्यात झटापट सुरू होती. अखेर काही अंतरावर जुईनगर स्थानक आल्यामुळे पकडले जाऊ या भीतीने सदर लुटारूने ऋतुजाला चालत्या रेल्वेतून ढकलून दिले. तसेच फलाट येताच उडी टाकून त्यानेही पळ काढला.
गंभीर दुखापत
रेल्वेतून तरुणी पडल्याचे निदर्शनास येताच प्रत्यक्षदर्शी व मोटरमन यांनी तिला तत्काळ उपचारासाठी वाशीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे.
चोरट्याविषयी अधिक कसलीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जुईनगर व नेरूळ स्थानकातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.