- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : जुईनगर येथील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक नसल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. रेल्वे येत असतानाही वाहनचालकांकडून रुळ ओलांडण्याचे प्रयत्न होत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यामुळे त्या ठिकाणी फाटक बसवण्याची मागणी होत असतानाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.
सानपाडा येथील कारशेडमध्ये ये-जा करणाऱ्या रेल्वेच्या मार्गावरच जुईनगर येथे रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी रेल्वेफाटक मोडकळीस आल्यानंतर रेल्वेचा कर्मचारी नेमण्यात आलेला होता; परंतु मागील काही वर्षांपासून तिथला सुरक्षारक्षकही हटवल्यापासून प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा होत आहे. त्या ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी नसल्याने वाहनचालकांसह पादचाºयांकडून रेल्वे येत असतानाही घाईमध्ये रुळ ओलांडण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये रेल्वेच्या वेगाचा अंदाज न आल्यास अपघाताच्या घटना घडत आहेत.
मागील पाच वर्षांत त्या ठिकाणी रेल्वेची कार, रिक्षा तसेच बसला धडक बसण्याचे डझनभर छोटे-मोठे अपघात घडले आहेत. तर अनेक दुचाकीस्वारांचे थोडक्यात प्राणही बचावले आहेत. सातत्याने घडणाºया अशा अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वेफाटक बसवण्याची अथवा सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे, त्यानुसार वर्षभरापूर्वी काही दिवसांकरिता रेल्वेचा एक कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यात आला होता; परंतु रेल्वे येत असताना वाहने थांबवण्याच्या त्याच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करून रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाला रेल्वेची धडक बसली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिथला सुरक्षारक्षकही हटवण्यात आलेला आहे. यामुळे सद्यस्थितीला त्या ठिकाणी फाटक अथवा रेल्वेचा कर्मचारी नसल्याने जीव धोक्यात घालून रुळ ओलांडण्याचे प्रकार घडत आहेत. याच प्रकारातून शनिवारी दुपारी कारशेडमधून नेरुळ स्थानकात जाणाºया रिकाम्या लोकलची एनएमएमटीच्या बसला धडक बसली. त्यामध्ये बसचा निम्मा भाग चेपला असून, सुदैवाने तिघांना किरकोळ दुखापत झाली. अपघाता वेळी रेल्वेच्या मोटरमनकडून हॉर्न वाजवला जात असतानाही, बसचालकाने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडला. त्यामध्ये रेल्वेच्या बंपरमध्ये बस अडकून काही अंतरापर्यंत रेल्वेसोबत घासत गेली.
वाशीवरून उरणला जाणारी ही बस होती. दहा दिवसांपूर्वी उरण मार्गावर रेल्वे सुरू झाल्याने या बसच्या प्रवासी संख्येत घट झालेली आहे. त्यामुळे अपघाता वेळी बसमध्ये प्रवासी कमी असल्याने ज्या ठिकाणी रेल्वेच्या बंपरची धडक बसली, त्या ठिकाणी प्रवासी बसलेले नव्हते. अन्यथा जीवितहानीची घटना घडली असती. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वेफाटक बसवण्याची मागणी राजकीय व्यक्तींसह विविध संघटनांनी केलेली आहे; परंतु रुळ क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक बसवण्याचे रेल्वेने बंद केलेले असल्याचे सांगून तिथल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे त्या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वेप्रशासनाची उदासीनतारेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक बसवावे, अथवा दोन्ही दिशेला दोन कर्मचारी नेमावेत, यासाठी चार वर्षांपूर्वीच रेल्वेकडे मागणी करण्यात आलेली आहे; परंतु लेखी पत्राद्वारे तसेच अधिकाºयांची भेट घेऊन या विषयी पाठपुरावा करूनही त्या ठिकाणी ठोस उपाययोजना राबवण्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेने फाटक बसवण्याचे बंद केल्याने त्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यासाठी सिडको अथवा पालिकेकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले जात आहे.- सचिन शिंदे, जिल्हासरचिटणीस, युवक काँग्रेस.
रुळालगतच्या झाडीमुळे तसेच वळणामुळे रेल्वे येत असल्याचे सहज दिसत नाही. मात्र, अचानक काही अंतरावर रेल्वे आल्यास हॉर्नमुळे वाहनचालक दचकून त्यांचा वाहनावरील तोल सुटतो. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वेने त्या ठिकाणी कर्मचारी नेमण्यासाठी गरज आहे.- अनिथा नायडू,महिला उपशहराध्यक्षा, मनसे