जॅकवेलमध्ये पडलेल्या मोरला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 01:33 AM2016-04-11T01:33:57+5:302016-04-11T01:33:57+5:30
तालुक्यातील माझेरी येथील एका जॅकवेलमध्ये पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनरक्षकाकडे सुपुर्द केल्यानंतर महाड एमआयडीसीतील सफर या वन्य पशुपक्षी शुश्रूषा केंद्रात शनिवारी सायंकाळी दाखल करण्यात आले
बिरवाडी : तालुक्यातील माझेरी येथील एका जॅकवेलमध्ये पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढून वनरक्षकाकडे सुपुर्द केल्यानंतर महाड एमआयडीसीतील सफर या वन्य पशुपक्षी शुश्रूषा केंद्रात शनिवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. सफर केंद्रातील सर्पमित्र गणराज जैन, डॉ. सोनावणे, डॉ. अर्चना जैन यांनी त्या जखमी मोरावर उपचार सुरू केले आहेत.
माझेरी येथील पारमाची वाडीवरील जॅकवेलमध्ये मोर पडल्याचे ग्रामस्थ बा. ल. सकपाळ यांनी पाहिले. त्यांनी याबाबत बिरवाडी वनरक्षक सुनील घोलप यांना कळविले. घोलप यांनी माझेरीजवळील तपासणी नाक्यातील वनरक्षक अंगद भोसले यास घटनास्थळी जाण्यास सांगितले. तोपर्यंत अशोक निकम, चंद्रकांत पवार व १५ ते २० ग्रामस्थांनी त्या मोराला काळजीपूर्वक काढून वनरक्षक भोसले यांच्या ताब्यात दिले. जॅकवेलमध्ये पडलेला मोर तीन ठिकाणी जखमी होता. मानेच्या खाली बाहेरील बाजूने अन्ननलिकेच्या मार्गापर्यंत मोठी जखम होती. मोराला घेऊन ताबडतोब वनरक्षक भोसले व ग्रामस्थ सतीश पवार यांनी सफर केंद्र गाठले. महाड येथील पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने वन खात्याच्या रोहा येथील उपविभागीय वनाधिकारी दीपक सावंत यांच्या परवानगीने व प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना कल्पना देऊन जखमी मोरावर डॉ. सोनावणे व डॉ. अर्चना जैन यांनी उपचार करण्यास सुरुवात केली. मोराच्या गळ्याची जखम आठ टाके घालून बंद करण्यात डॉ. अर्चना जैन व डॉ. सोनावणे यांना यश आले. (वार्ताहर)