कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:05 AM2017-11-30T07:05:13+5:302017-11-30T07:05:23+5:30
आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई : आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर, आयुक्त यांच्या पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच गोरगान इराण येथे दि. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम विजेतेपद संपादन करून देशाचा बहुमान वाढविला आहे. त्यातही महिलांच्या क बड्डी संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे या महापालिकेच्या क्रीडा अधिकारी असल्याने हे यश नवी मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशी परतल्यावर आज महापालिका मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते महापौर दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विशाल डोळस, समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती अनिता मानवतकर, माजी महापौर सागर नाईक, उपायुक्त अंकुश चव्हाण, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, माजी नगरसेवक संदीप सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर जयवंत सुतार म्हणाले, अभिलाषा म्हात्रे या महिला कबड्डीतील आयकॉन असून नवी मुंबई शहराचे भूषण आहेत. त्या भविष्यात अशी अनेक शिखरे पार करतील, त्यासाठी शहरवासीयांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत. तसेच पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत त्यांचा सभागृहात यथोचित सन्मान करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही अभिलाषा म्हात्रे यांना सत्कार करत उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, जेव्हा पालिकेचे अधिकारी आंतरराष्टÑीय पातळीवर अशी कामगिरी करतात त्यावेळी आपोआपच शहराचा व महापालिकेचा गौरव होतो. तसेच
ही कामगिरी नव्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी सत्कारमूर्ती अभिलाषा म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांचे प्रेम व पालिकेकडून खेळासाठी मिळणारे प्रोत्साहन याचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. मी यापुढील काळात आपल्या सदिच्छांच्या बळावर खेळाचा आणखी दर्जा उंचावण्याकडे अधिक लक्ष देईन, अशा भावना व्यक्त केल्या.