आफ्रिकेतील कॉम्रेडस् मॅरेथॉनमध्ये कैलास शिंदे यांनी उमटविला ठसा
By कमलाकर कांबळे | Published: June 10, 2024 08:15 PM2024-06-10T20:15:22+5:302024-06-10T20:15:33+5:30
८६.६ किमी अंतर ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदांत केले पार
नवी मुंबई : जगातील सर्वांत आव्हानात्मक आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील शंभर वर्षांची पंरपरा असलेल्या अपहिल कॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ८६.६ किमी अंतर अवघ्या ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदांत कापण्यात यश मिळविले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग ते डर्बन या दोन शहरादरम्यान ८६.६ कि. मी. अंतराची मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी १२ तासांचा कालावधी निश्चित केला होता. शिंदे यांनी ११ तास १० मिनिटे आणि ५६ सेकंदात हे ८६.६ किमीचे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. चढण आणि उतार अर्थात अप ॲण्ड डाउन या पद्धतीने ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी मॅरेथॉनचा मार्ग अपहिल म्हणजेच चढणीचा होता. या अंतर्गत १२ तासांत ५,९२३ फूट उंचीचे अंतर पूर्ण करायचे होते. समुद्रसपाटीपासून हे अंतर जवळपास १८०० मीटर उंचीवर आहे. या मार्गातील लहान मोठ्या २० ते २५ टेकड्या चढणे बंधनकारक असते.
या जागतिक मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे डॉ. कैलास शिंदे हे एकमेव सनदी अधिकारी ठरले आहेत. मुंबई मॅरेथॉनसह महाराष्ट्रातील विविध मॅरेथॉनमध्ये ते नियमित भाग घेतात. गेल्या वर्षीही त्यांनी या 'कॉम्रेडस् मॅरेथॉन'मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी स्पर्धेचे स्वरूप उताराकडे होते. त्यावेळी त्यांनी ११ तास ६ मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची अपहिल मॅरेथॉन अधिक खडतर आणि कठीण होती. त्यासाठी त्यांनी पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील रस्त्यांवर, डोंगररांगांवर सराव कसून सराव केला होता. दरम्यान शारीरिक, मानसिक, समर्पण आणि चिकाटी आदी गुणांची चाचणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.