आघाड्यांनी तापवले कळंबोलीतील राजकारण
By admin | Published: March 25, 2017 01:39 AM2017-03-25T01:39:05+5:302017-03-25T01:39:05+5:30
पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार प्रभागांचा समावेश असलेल्या कळंबोली वसाहतीत आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे.
अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार प्रभागांचा समावेश असलेल्या कळंबोली वसाहतीत आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये रोडपाली-कळंबोली विकास आघाडी व शेकाप-काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा समावेश आहे. भारतीय जनता पक्ष-रिपाइं युतीने सुद्धा कंबर कसली आहे. शिवसेनेनेकडूनही कळंबोलीत तयारी सुरू झाल्याने हळूहळू परिसरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
कळंबोली वसाहतीत तीन प्रभाग झाले असून कळंबोली गावासह इतर काही भाग जोडून आणखी एक प्रभाग तयार झाला आहे. प्रभाग क्र मांक ७ मध्ये रोडपालीचा बराचसा भाग समाविष्ट आहे. एकूण आठ सेक्टरचा समावेश असलेल्या या प्रभागात मार्बल मार्केटचाही समावेश आहे. चोवीस हजार लोकवस्ती आणि साडेसोळा हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. येथील कॉस्मोपॉलिटन मतदारांना एकत्रित करून त्यांच्यातून रोडपाली- कळंबोली विकास आघाडीने उमेदवार निश्चित केलेला आहे. या प्रभागात शेकाप-काँग्रेस, राष्ट्रवादीकडून चाचपणी करण्यात आलेली आहे. भाजपाकडून काहींना प्रोजेक्ट करण्यात येत आहे. शिवसेनेचा सुध्दा प्रभाग क्र मांक-७ मध्ये सर्व्हे सुरू झाला आहे. प्रभाग ८ मध्ये कळंबोली वसाहतीतील पाच सेक्टर आहेत. राजकीयदृष्ट्या हा प्रभाग प्रतिष्ठेचा होऊ लागला आहे. याचे कारण राजकीय नेत्यांच्या मुलांना येथून निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. इतर पदाधिकारी सुध्दा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या प्रभागात तिकीट मिळविण्याकरिता शेकाप-राष्ट्रवादी आघाडीबरोबर भाजपा व शिवसेना या पक्षांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. वसाहतीचा काही भाग तसेच गावांबरोबरच आसुडगाव, वळवली, टेंभोडे, खिडुकपाड्याचा समावेश असलेला प्रभाग ९ आहे. या ठिकाणी स्थानिक मतदारांचा प्रभाव असला तरी कळंबोली वसाहतीतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. या प्रभागातून भविष्य आजमावण्यासाठी काही जण तयारीत आहेत. प्रभाग १० मध्ये चार सेक्टरचा समावेश आहे. येथे शेकाप, काँग्रेस राष्ट्रवादी, रोडपाली- कळंबोली विकास आघाडी, भाजपा, शिवसेनेने कंबर कसली आहे. कळंबोली वसाहतीत एकूण बारा नगरसेवक महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करणार आहे.