कळंबोली खाडीपात्रात मृत माशांचा खच , जलचरांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 07:11 AM2018-05-27T07:11:56+5:302018-05-27T07:11:56+5:30
कळंबोली शहरातील सिडको कार्यालयाशेजारी असलेल्या खाडीच्या पात्रात शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
- शैलेश चव्हाण
तळोजा - कळंबोली शहरातील सिडको कार्यालयाशेजारी असलेल्या खाडीच्या पात्रात शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी असलेल्या आंबेतारी खाडीच्या पाण्यात रासायनिक पाणी मिसळल्याने हे मासे मृत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कासाडी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आता नवीन प्रकरण समोर आले आहे. कळंबोली येथील खाडीपात्रातदेखील आता मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. आंबेतारी खाडीत शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. संपूर्ण पात्रात मृत माशांचा खच पडला होता. रसायनयुक्त पाणी खाडीत सोडल्याने त्याचा परिणाम माशांवर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्या रसायनयुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रि या न करता हे पाणी थेट नदीच्या खाडीपात्रात व नाल्यामध्ये सोडतात. काही दिवसांपूर्वी कासाडी नदी पात्रातदेखील मृत माशांचा खच पाहावयास मिळाला होता. कासाडी नदीच्या पात्रात होणाऱ्या जलप्रदूषणाचा मोठा फटका या ठिकाणी मासेमारी करून उपजीविका चालवणाºया कोळी बांधवांना बसला होता. या वेळी शेकडो मासे मृत झाल्याची घटना घडली होती.तळोजा एमआयडीसीच्या काही कारखान्यांतून छुप्या पद्धतीने कासाडी नदीत रासायनिक पाणी सोडले जात आहे. याबाबत वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करूनदेखील योग्य कारवाई केली जात नसल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीने केली आहे. विकास समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.