कळंबोली सर्कलला मिलिंग मशिन
By admin | Published: June 16, 2017 02:28 AM2017-06-16T02:28:33+5:302017-06-16T02:28:33+5:30
स्टील मार्केटमुळे कळंबोली सर्कल परिसरातील रस्ते वारंवर खड्डेमय होतात. त्यामुळे वाहन चालविणे जिकिरीचे होऊन अपघातांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात खोलीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : स्टील मार्केटमुळे कळंबोली सर्कल परिसरातील रस्ते वारंवर खड्डेमय होतात. त्यामुळे वाहन चालविणे जिकिरीचे होऊन अपघातांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहने उसळतात. यावर उपाय म्हणून आयआरबीने या ठिकाणचे खड्डे बुजवण्याकरिता मिलिंग मशिनचा आधार घेतला आहे.
संगणकीय प्रणालीवर चालणाऱ्या या मशिनव्दारे खड्डे बुजविण्यात येत असून त्याचा दर्जा चांगला असल्याने रस्ता लवकर खराब होत नसल्याचा दावा आयआरबीकडून करण्यात आला आहे.
कळंबोली सर्कलवरून द्रुतगती तसेच मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटी, मुंब्रा-कल्याण मार्ग जोडले गेले आहेत. एकंदरीतच जंक्शन असल्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. विशेष करून बाजूला लोह-पोलाद मार्केट असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची गर्दी असते. जेएनपीटीलाही कळंबोली सर्कलवरूनच जावे लागते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची येथे जास्त वर्दळ असते. त्यामुळे सर्कललगतचे रस्ते खराब होतात, मोठमोठे खड्डे पडतात. महामार्गावर कळंबोली वाहतूक शाखेसमोर मोठे खड्डे पडले होते. दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यामध्ये साचते त्यामुळे वाहनचालकांना काहीच अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात वाहन आदळून अपघात होत असल्याचे वाहतूक पोलिसांचे निरीक्षण आहे. पाण्याचा निचरा करण्याकरिता चांगली उपाययोजना न झाल्याने कळंबोली सर्कलला खड्डे पडतात. मुंब्रा महामार्गावर कळंबोली सर्कललगत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यासंदर्भात कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला. तर वाहतूक विभागाने खड्ड्यांबाबत संबंधित विभागाला पत्रही देण्यात आले होते. त्यानुसार पावसाच्या अगोदर आयआरबीने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम हाती घेतले आहे.
मशिनचे वैशिष्ट्य
पूर्ण संगणकीय प्रणालीचा वापर या मशिनमध्ये गेला आहे. त्या माध्यमातून एक फूट खोलपर्यंत काँक्रीट, डांबर, खडी उकरता येते. त्यानंतर त्या खड्ड्याची तंतोतंत लेवल करून कॉम्प्रेशरने साफसफाई करण्यात येते. त्यानंतर डांबर भरून रस्ता पक्का केला जातो.एका तासात ही मशिन सातशे मीटर काम करते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १३0 एच.पी.ची ही मशिन तयार केली आहे. संगणकाव्दारे ही मशिन आॅपरेट केली जाते. आतापर्यंत आम्ही दहा हजार खड्डे या मशिनव्दारे बुजवले आहेत. सात तास ही मशिन चालवली जाते, कामाचा उरक होतोच त्याचबरोबर दर्जा राखला जातो.
- उमेश कोल्हाळ,
सुपरवायझर, आयआरबी