कळंबाेली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कळंबोली वसाहतीजवळ दोन वर्षांपूर्वी कळंबोली गाव ते पाण्याच्या टाकीपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात आला. दोन वर्षांतच पुलाचे जोडणी अंतर वाढल्याने कळंबोली उड्डाणपुलावरील मुंब्रा जाणारी मार्गिका काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी बाजूचा सर्व्हिस रोड त्याचबरोबर स्टील मार्केट रोडचा वापर करण्यात येत आहे. २५ महिन्यातच पुलाचे काम निघाल्याने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पनवेल-मुंब्रा महामार्गावर लहान मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बरोबर वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा बसवण्यासाठी कळंबोली येथील उड्डाणपुलाची अत्यंत गरज होती. त्यासाठी राजकारणी, नागरिक, सामाजिक संस्थेकडून उड्डाणपुलासाठी झालेल्या मागणीची दखल घेत, रस्ते विकास महामंडळाने कळंबोली या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलासाठी ६१.३७ कोटी खर्च करण्यात आला आहे. ११३० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण करुन फेब्रुवारी २०१९ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यामुळे जेएनपीटी, मुंब्रा, तळोजा एमआयडीसी येथे जाणा-या वाहनचालकांना दिलासा मिळाला तर वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली. वाहतूक पोलिसांवर येत असलेला ताण थोड्याफार प्रमाणात कमी झाला. पण दोनच वर्षांत उड्डाणपुलाचे काम काढल्याने या पुलाच्या बांधकाम दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.दोन वर्षांत दोनदा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदउड्डाणपूल बांधल्यानंतर सहा महिन्यात पावसाळी दिवसाला सुरुवात झाली. तेव्हा पावसात उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी काही दिवस मार्गिका बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता जोडणीतील अंतर वाढल्याने हा उड्डाणपूल काही दिवसाकरिता बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड तथा लोहपोलाद मार्केट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोंडी होऊ नये यासाठी लक्ष ठेवून आहेत.कळंबोली उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम सुरू आहे. मान्सूनपूर्व कामे असल्याने ती आता कामे करुन घेण्यात येत आहे. मुंब्रा जाणारी मार्गिका कामासाठी बंद ठेवण्यात आली आहे. चार दिवसात काम पूर्ण करुन मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल. - राकेश सोनवणे, अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ
कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; निकृष्ट कामामुळे दोन वर्षांतच दुरुस्तीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 12:43 AM