कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. याच कारणाने महिलांनी थेट कळंबोली येथील सिडको कार्यालय गाठले आणि तिथे ठिय्या मांडला. त्यामुळे सिडकोचे बेलापूर येथील कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना त्या ठिकाणी यावे लागले. त्यांच्याकडून ठोस आश्वासन दिल्यानंतर महिलांनी कार्यालये सोडले.कळंबोलीत सिडकोने एलआयजी टाइपची घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी अनेक बऱ्याच समस्या व प्रश्नांनी डोके वर काढल्याची वस्तुस्थिती आहे. या परिसरात पाण्याची खूप म्हणजे खूपच ओरड सुरू आहे. सेक्टर-३ मध्ये पाणीच येत नाही. सोडले तरी ते रात्री २-३ वाजता सोडले जाते. थेट एमजेपीकडून येणारे पाणी या भागाला येत असल्याने शटडाउन व सुट्टीच्या वेळी पाण्याचा गंभीर प्रश्न असतोच. त्याशिवाय सिडकोकडून योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने एलआयजींच्या घरांना पाणीच मिळत नाही. गेल्या महिन्याभरापासून अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यानुसार सिडकोकडे वारंवार तक्र ारीही करण्यात आल्या. मात्र, परिस्थितीत बदल अजिबात झाला नाही. त्या कारणाने या भागातील महिलांच्या नगरसेविका मोनिका महानवर व कमल कदम यांनी मोर्चा काढला. १०० पेक्षा जास्त महिला पाणीपुरवठा विभागात गेल्या. मात्र, तिथे अधिकारी तसेच जबाबदार व्यक्ती नसल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत कोणी येत नाही, तोपर्यंत कार्यालयाच्या परिसरातून हलायचे नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. दुपारी १.४५ वाजता कार्यकारी अभियंता गजानन दलाल हे कळंबोली कार्यालयात आले. आंदोलनामध्ये मोनिका महानवर, कमल कदम व इतर मान्यवर उपस्थित होते. केवळ एकाच दिवसाचे नाही तर गेल्या काही वर्षांपासून सेक्टर-३ ला पाणी येत नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अधिकारी निवडणूक ड्युटीवरया विभागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेले गणेश चंदनकर यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. तर सहायक कार्यकारी अभियंता चंद्रहास सोनकुसरे यांनाही निवडणुकीत नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे कळंबोलीतील पाण्याचे नियोजन, तक्र ारी निवारणार्थ अधिकारीच नाही.
पाण्यासाठी कळंबोलीत मोर्चा; एलआयजी परिसरामध्ये अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:44 AM