कळंबोलीतील शासकीय वसाहतींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:46 AM2018-03-17T02:46:16+5:302018-03-17T02:46:16+5:30

कळंबोलीमधील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी गटारामधून बाहेर आले असून पूर्ण वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

Kalamboli government colonies, misery due to sewage | कळंबोलीतील शासकीय वसाहतींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे दुर्गंधी

कळंबोलीतील शासकीय वसाहतींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे दुर्गंधी

googlenewsNext

- शैलेश चव्हाण 
तळोजा : कळंबोलीमधील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी गटारामधून बाहेर आले असून पूर्ण वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कळंबोली सेक्टर ४ ई या ठिकाणी सध्या शासकीय वसाहतींच्या आवारात मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी बाहेर आले आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांनी या समस्येविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु तक्रारींची योग्य दखल घेतली जात नाही. मलनि:सारण वाहिन्यांची दुरुस्ती केली जात नाही. घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरामध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अभियान राबविले जात आहे, परंतु सरकारी वसाहतीमध्ये मात्र या अभियानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कळंबोली या ठिकाणी असलेल्या शासकीय वसाहतींचे सध्या बांधकाम विभागाच्या भिंगारी विभागाकडून स्ट्रक्चरल आॅडिट केले जात आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आखडता हात घेतला आहे.
या ठिकाणी एकूण २२ इमारती आहेत. या इमारतीत राहणारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा घरभाडे कापले जाते, मात्र कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाही. जीर्ण झालेल्या इमारतींचे स्लॅब, घरात होणारी स्लॅबची पडझड, किडे, उंदीर, घुशी यांचा नाहक त्रासात वर्षानुवर्षे हे कर्मचारी मूग गिळून राहत आहेत, मात्र कोणतीही दखल अद्याप घेतली जात नाही. याबाबत लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच आता आम्हाला न्याय द्यावा अशी कळकळीची विनंती येथील रहिवासी करताहेत. घाण व दुर्गंधीमुळे वसाहतीमधील नागरिकांचे आरोग्य बिघडले, डेंग्यू व मलेरियामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.
वारंवार तक्र ारी करून देखील दखल घेतली जात नाही. सध्या मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- धनाजी सकपाळ,
अध्यक्ष,
राज्य शासकीय वसाहत
कळंबोली
शासकीय वसाहतींच्या डागडुजीबाबत लवकरात लवकर आॅडिट करून येथील कामे केली जातील.
- गोपीनाथ मोहिते,
अधीक्षक अभियंता
सा.बां. विभाग बेलापूर
या ठिकाणी साचत असलेले पाणी यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच दखल घेऊन दोन महिन्यात या कामाची पूर्तता करू.
- आर. आर. पाटील,
कार्यकारी अभियंता
भिंगारी

Web Title: Kalamboli government colonies, misery due to sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.