कळंबोली रेल्वे धक्क्यावर चिखल, साडेतीन हजार माथाडी कामगार असुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:24 AM2019-06-26T02:24:19+5:302019-06-26T02:25:03+5:30
कळंबोली येथील मालधक्क्यावर काँक्रीटीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे येथे उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - येथील मालधक्क्यावर काँक्रीटीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे येथे उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे कामगारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांना काम करावे लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याची खंत माथाडी कामगार व्यक्त करीत आहेत.
कळंबोलीतील रेल्वेधक्क्यावर मालगाडीवरून विविध राज्यातून लोखंडी प्लेट, पत्रा, अवजड लोखंडी सामान रेल्वेद्वारे कळंबोलीत आणले जाते. हे सामान माथाडी कामगार तसेच क्रेनच्या साहाय्याने उतरवून ट्रकमध्ये लोडिंग केली जाते. यासाठी नोंदणीकृत साडेतीन हजार माथाडी कामगार काम करतात. मालधक्क्यावर सुविधांची वानवा आहे. निवारा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार केंद्र या बाबी कामगारापासून दूर आहेत. या सुविधांचा वापर कोणत्याही कामगाराला मिळत नाही. रात्री दिवे बंद असतात.
त्यामुळे काळेखातही काम करावे लागते. सर्वात मोठा त्रास आहे तो रेल्वे धक्क्यावर असलेल्या मातीचा. उन्हाळ्यात ट्रकची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने धूळ उडते. त्यामुळे कित्येक कामगारांना श्वसनाचे विकार जडले आहेत. खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहेत. खड्ड्यांमध्ये क्रेन चालवणे खूप जिकिरीचे बनले आहे. कित्येकदा क्रेन पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. लोखंडी प्लेट उतरवताना क्रेन खड्ड्यात गेल्याने अपघातास निमंत्रणच मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वेतून प्लेट काढताना क्रेन खड्ड्यात गेल्याने एका व्यापाऱ्याचा बळी गेला. त्याचबरोबर पावसाळ्यात याच खड्ड्यात पाणी साचते. सोमवारी काही प्रमाणात पाऊस पडल्याने संपूर्ण मालधक्क्यावर चिखल झाला होता. या दलदलीत काम करीत असताना कामगारांना पायाला चिखली तसेच भेगा पडतात.
याबाबत उपाययोजना म्हणून रेल्वेच्या वाणिज्य विभागाने रेल्वेधक्क्यावर काँक्रीटीकरणाच्या प्रस्ताव दिला आहे; परंतु त्याबाबत गेल्या वर्षभरात काहीच हालचाली झाल्या नाहीत. म्हणून माथाडी कामगारांना धुळीत आणि चिखलात काम करावे लागत असल्याची प्रतिक्रिया माथाडी कामगारनेते राजेंद्र बनकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
१२ वर्षांपासून माथाडी कामगारांची परवड सुरूच
मालधक्क्यावर काँक्रीटीकरण करण्यात यावे, यासाठी १२ वर्षांपासून कामगार पाठपुरावा करीत आहेत, तरी रेल्वेकडून यासंदर्भात दखल घेतली जात नाही. आमच्या कामगारांना १२ महिने धूळ, चिखलातच काम करावे लागत आहे. तर आवश्यक असलेल्या सुविधाही रेल्वेकडून दिल्या जात नाहीत. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे भाजपप्रणित माथाडी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास महानवर यांनी सांगितले.
रेल्वेधक्का परिसरातील काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव आम्ही अभियंता विभागाला पाठवला आहे. त्यानुसार जागेची मोजणीदेखील झाली आहे, त्यानुसार आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर काम कसे करता येईल यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. इतर सुविधांचीही दखल घेतली जाईल.
- संजय गुप्ता, मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे