कळंबोलीत रखडली नाले सफाईची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:02 AM2019-05-27T00:02:17+5:302019-05-27T00:02:19+5:30

अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला तरी कळंबोलीतील पावसाळी नाले सफाई अद्याप सुरू झालेली नाही.

Kalamboli road cleaning works | कळंबोलीत रखडली नाले सफाईची कामे

कळंबोलीत रखडली नाले सफाईची कामे

Next

कळंबोली : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला तरी कळंबोलीतील पावसाळी नाले सफाई अद्याप सुरू झालेली नाही. येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात माती, डेब्रिज, कचरा साचलेला आहे. यंदा सिडकोने नाले सफाईकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या नाल्याची लवकरात लवकर मान्सूनपूर्व सफाई करावी, अशी मागणी कळंबोलीतील रहिवाशांनी केली आहे.
कळंबोली वसाहत समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याची उदाहरणे घडलेली आहेत. २००५ मध्ये आलेल्या महापुरात सर्वात जास्त मनुष्य व वित्तहानी कळंबोली वसाहतीत झाली होती. त्यामुळे दर वर्षी सिडकोकडून ३१ मेपर्यंत नाले सफाईचे काम पूर्ण होत असे. महापालिका अस्तित्वात आल्यापासून सिडकोने कळंबोली वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वसाहतीत सुविधांची वानवा जाणवते. याचा परिणामही रहिवाशांना भोगावा लागतो आहे. सिडकोकडून कोणतेही काम केले जात नसल्याची ओरड रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सेक्टर १ मधील मुख्य नाल्यातून कळंबोलीतील पाणी खाडीला मिळते. या नाल्यात मानवी कचरा, डेब्रिज, माती, बाटल्या, थर्माकॉल मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्याचबरोबर सेक्टर १० ई येथील नाल्यांची अवस्थाही बिकट आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. मे महिना संपत आला तरी सिडकोकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत. जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल, त्यामुळे वसाहतीत त्वरित नाले सफाईची कामे सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
>सिडकोकडून चालढकल
कळंबोली त्याचबरोबर रोडपाली वसाहतीतील अंतर्गत पावसाळी नाल्यांची साफसफाई करण्यास सिडकोकडून चालढकल करण्यात येत आहे. आचार संहिता व इलेक्शन ड्युटीचे कारणे पुढे करत सिडकोने मे महिना अखेर गाठला. १५ दिवसांत तरी नालेसफाईची कामे होतील का? असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
>कळंबोली वसाहतीत कुठेही पाणी साचणार नाही यासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत. याकरिता दोन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली

Web Title: Kalamboli road cleaning works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.