कळंबोली : शहरातील चालकांचे प्रबोधन करण्यासाठी कळंबोली वाहतुक पोलीसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ‘मराठीत सांगितलेल कळत नाही का, की इंग्लिशमध्ये सांगू? असे घोषवाक्य तयार करून दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वाराचे नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधन करण्यात आले. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नाही अशा चालकांच्या डोक्यावर हा फलक धरला जात होता. शिवाय चालकांच्या डोक्यावर यमाच्या शिंगाची प्रतिकृती लावण्यात येत होती. हेल्मेट हे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याकरीता नाही तर जीविताचे रक्षणासाठी घालावे असे आवाहनही यावेळी पोलीसांसह स्वयंसेवकांनी केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करण्यात आली. यावेळी वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरक पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक नंदकुमार कदम, अतिष वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मण तळकर, पोलीस हवालदार यादव शेलार, संजय धारेराव, बाळासाहेब कारंडे, हरीदास गिते, संदिप फाळकेस बाळासाहेब कालेल यांच्यासह कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते. गेल्या काही दिवसात हेल्मेट, कार रॅली, शाळांमध्ये प्रबोधन, कंपनी कामगारांना मार्गदर्शन, वाहन चालक, पादचाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. आरोग्य चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वाहनचालक व पोलीस कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली.
कळंबोली वाहतूक पोलिसांकडून नागरिकांचे ‘सैराट’ प्रबोधन
By admin | Published: January 23, 2017 5:42 AM