कळंबोलीकरांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:04 AM2019-07-20T00:04:26+5:302019-07-20T00:04:35+5:30
कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत.
कळंबोली : कळंबोली वसाहतीतील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत. येथील पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असून सिडको व महापालिकेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, तर केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे डोंगरी येथील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती कळंबोलीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिडकोने कळंबोली वसाहत विकसित करताना अल्प उत्पन्न गटातील लोकांकरिता १८ हजार घरे बांधली. या ठिकाणी सिडकोकडून काही वर्षे सुविधा पुरवण्यात आल्या. मात्र, गेल्या दहा वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्लॅब कोसळणे, भिंतीला तडे जाणे, पावसाळ्यात गळती लागणे, प्लॅस्टर निघणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सिडकोकडून घरांची किरकोळ दुरुस्तीही करण्यात न आल्याने इमारती मोडकळीस आल्या आहेत. वारंवार पुनर्विकासासाठी पाठपुरावा करूनही सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे आत्माराम कदम या रहिवाशाचे म्हणणे आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली. मोडकळीस आलेल्या घरांची जबाबदारी महापालिकेची आहे, असे सिडकोकडून सांगण्यात येते तर महापालिका सिडकोकडे बोट दाखवते. त्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोडकळीस आलेली घरे जमीनदोस्त करून त्या जागी नवीन इमारती बांधण्यासाठी आतापर्यंत शासनाने चार वेळा जीआर काढला; पण आजपर्यंत ठोस भूमिका घेतली गेली नाही. सिडकोकडून दोन वर्षांपासून धोकादायक इमारतींना नोटिसा देणे बंद केले आहे. यंदा महापालिकेकडून फक्त सात इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. डोंगरी येथील इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले. कळंबोलीतही गेल्या दहा वर्षांपासून धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आहे.
>कळंबोली वसाहतीत सेक्टर १, १ई मधील एफ टाइप, के एल ६, सेक्टर ३ ई मध्ये एफ टाइप, केएल ५, केएल ६, ई टाइप, सेक्टर ४ ई येथील एफ टाइप, केएल ४, एफ टाइप, त्याचबरोबर सेक्टर ५ मधील केएल २, तर सेक्टर ६ मधील केएल १ या परिसरातील जवळपास सात हजार घरे मोडकळीस आली आहेत.
>कळंबोली वसाहतीतील धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तशा रहिवाशांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. पुनर्विकासासाठी सिडकोने दखल घेतली पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त,
पनवेल महापालिका