कळंबोली वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:42 PM2018-10-21T23:42:06+5:302018-10-21T23:42:07+5:30
ठेकेदाराकडून वाहने पुरवली जात नसल्याने कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
कळंबोली : ठेकेदाराकडून वाहने पुरवली जात नसल्याने कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. रस्त्यावरील कचराकुंड्या भरल्या आहेत, तर सोसायट्यांमधील बिन्समध्ये सुध्दा कचरा ठेवण्याकरिता जागा शिल्लक नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची सेवा हस्तांतरित करून घेतली आहे. हे काम सिडकोच्या ठेकेदाराला तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. मात्र त्याच्याकडे वाहने नसल्याने कचरा उचलण्यात नियमितता नाही.
सुरुवातीला एक दोन दिवस परिस्थितीत सुधारणा झाली असली तरी आता जैसे थे स्थिती आहे. विशेष करून कळंबोली नोडमधील घनकचरा व्यवस्थापनाची अवस्था बिकट आहे. गेल्या तीन दिवसांपासून वसाहतीतील कचराच उचलला गेला नाही. त्यामुळे फायरब्रिगेड ते कळंबोली पोलीस ठाणे मार्गावर १०० मीटर अंतरावर कचराच कचरा दिसून येत आहे. केएलई कॉलेजच्या पाठीमागे, जाधव वाडीजवळील स्थिती फारशी वेगळी नाही. त्या व्यतिरिक्त ज्ञानमंदिर स्कूल, रोडपाली बस डेपो, सेक्टर-११ येथील नीलसंकुल, धन्वंतरी हॉस्पिटल व इतर अनेक ठिकाणी कचराच कचरा पडला आहे. सोसायट्यांच्या बाहेर ठेवलेल्या बिन्स भरून कचरा बाहेर पडला आहे. त्यामुळे रहिवाशांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.
नादुरुस्त वाहने
सिडकोने नियुक्त केलेल्या कविराज इंटरप्रायझेसकडे वाहनांचा तुटवडा आहे. कळंबोलीकरिता असलेल्या चार गाड्यांपैकी दोन बंद आहेत आणि उर्वरित दोनपैकी एकच वाहनात रविवारी कचरा भरला जात होता तोही जेसीबीने. त्यामुळे जवळपास दीडशे टनापेक्षा जास्त कचरा या नोडमध्ये पडून आहे. त्याचबरोबर कामगारांना पूर्वीप्रमाणे ओव्हरटाइम दिला जात नसल्याने ते सुध्दा पाठ फिरवत आहेत. कमी कालावधीत जास्त काम आल्याने त्यांचीही दमछाक झाली आहे.
सोशल मीडियावर कचरा
कळंबोली वसाहतीत साचलेल्या कचºयाचे फोटो क्लिक करून अनेकांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे स्मार्ट समजल्या जाणाºया सिडको नोडची ही स्थिती असल्याच्या प्रतिक्रि या सोशल मीडियात येवू लागल्या आहेत.
>गेले दोन दिवस कळंबोली नोडमध्ये गाडी नादुरुस्त होती. त्यामुळे काही ठिकाणचा कचरा उचलता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता हा कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोसायट्यांमध्येही बैठका घेतल्या जात आहे. नवीन गाड्या आल्यानंतर तक्र ारी येणार नाहीत.
- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका