कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:18 AM2018-08-18T03:18:19+5:302018-08-18T03:18:30+5:30
कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कारणाने कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे, तसेच लहान मुलांना खेळता येत नाही.
सिडकोने आरक्षित भूखंडावर उद्याने निर्माण केली. त्या त्या सेक्टरचे रहिवाशांना विरंगुळ्याकरिता चांगले ठिकाण मानले जात होते. मात्र या उद्यानाच्या देखभालीकडे सिडकोने लक्षच दिले नाही. त्यामुळे आज येथील अवस्था बिकट आहे. सेक्टर -१0 येथे १६ आणि १७ या दोन भूखंडावर उद्यान आहे. सिडकोने येथे सुरूवातीला सुविधा निर्माण केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने या सुविधा सुस्थितीत राहिल्या नाहीत. भूखंड क्र मांक-१६मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तसेच झाडे झुडपांचे प्रमाण जास्त आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने या निरूपयोगी झुडपांची वाढ अधिक होत आहे. त्यामुळे या उद्यानाचा वापर करता येत नाही. सायंकाळच्या वेळी डासांचे प्रमाण तर असतेच तसेच सापांचा वावर वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकवर हे सरपटणारे प्राणी येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. भूखंड क्र मांक-१७मधील विजेचे फक्त खांब उभे आहेत, त्यांना दिवेच नाहीत. मध्यभागी हायमास्ट असला तरी त्याचा प्रकाश संपूर्ण उद्यानात पडत नाही. तसेच येथे पाणी साचत असल्याने चिल्ड्रन पार्कमध्ये दलदल झाली आहे. सेक्टर -११मधील उद्यानातही तीच स्थिती आहे. या परिसरातही गवत वाढले आहे. सेक्टर-५ई मधील उद्यानामध्ये दलदल असल्याने तिथे फेरफटका मारताना त्रास होत आहे.
पावसाळा असल्याने गवत वाढले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यानुसार सर्व उद्यानांची पाहणी करण्यात येईल आणि ज्या त्रुटी आहेत त्या काढण्यात येईल. तसेच गवत कटिंगचे काम हाती घेण्यात येईल
- गिरीश रघुवंशी,
कार्यकारी अभियंता,
सिडको, कळंबोली नोड
पायाभूत सुविधा देण्याकरिता सिडकोने कायम आखडता हात घेतलेला आहे. त्यामध्ये उद्यानाचा विषय सर्वात अग्रभागी म्हणावा लागेल. आता तर महापालिका झाली असल्याने सिडको प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मनपाकडे बोट दाखवते. मात्र त्यांनी हे गार्डन सुस्थितीत करून दिले पाहिजे.
- अशोक मोटे,
चिटणीस भाजपा, पनवेल तालुका
स्मृती गार्डनला अवकळा
फायरबिग्रेडपासून जवळ असलेल्या स्मृती गार्डनला अवकळा आली आहे. पाऊस असल्याने आता या प्रशस्त गार्डनमध्ये चिखलाचे साम्राज्य दिसून येते. एलआयजीमधील पाणी येथे उतरत असल्याने वर्षभर रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतो. लहान मुलांकरिता खेळणी बसविली असली तरी तिथे आता डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्यानाच्या बाहेरील पदपथावर बेकायदेशीर गॅरेज असल्याने तिथे आॅईल टाकले जाते. तिथे अनेकदा लहान मुले घसरून पडतात.