कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 02:05 AM2019-05-06T02:05:19+5:302019-05-06T02:05:30+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे.
नवी मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई विभागात खेळविल्या जाणाºया सामन्यांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती एमसीएने महापालिकेकडे केली होती; परंतु महापालिकेच्या क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण पुढे करून एमसीएच्या या विनंतीला केराची टोपली दाखविली आहे.
कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षे वयोगटाखालील संघासाठी खेळाडूंची निवड केली जाते. ही स्पर्धा आठ विभागांत खेळविली जाते. या वर्षी ४ मे पासून या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. यात जवळपास ३५० खेळाडू खेळणार आहेत. नवी मुंबईतील दोन संघ असून, त्यांच्यात सहा सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती एमसीएने महापालिकेकडे केली होती; परंतु महापालिकेच्या क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण पुढे करून क्रिकेटबाबतची आपली उदासीनता दाखवून दिली आहे. एकीकडे शहरातून चांगले क्रिकेटपटू तयार व्हावेत, या दृष्टीने विविध सुविधा पुरविल्या जात असल्याचा कांगावा महापालिकेच्या वतीने केला जात आहे, तर दुसरीकडे उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या पंखांना बळ देणाºया स्पर्धांबाबत मात्र नकारात्मक दृष्टिकोन बाळगला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मैदान वगळता या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आयोजक क्लबच्या माध्यमातून करण्यात येतो; परंतु या स्पर्धा त्या त्या विभागात पार पडल्यास खेळाडूंची दमछाक होणार नाही, तसेच स्थानिक स्तरावर क्रिकेट आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेचा प्रचार होईल, अशी आयोजकांची भूमिका आहे. काही वर्षांपूर्वी विभागीय सामने खेळण्यासाठी मुंबई किंवा ठाणे येथे जावे लागत असे. परंतु मागील वर्षापासून या स्पर्धा नवी मुंबईतच खेळविल्या जात आहेत. या वर्षी हे सामने महापालिकेच्या सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडिअमवर खेळविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला होता. या संदर्भात एमसीएनेही महापालिकेला विनंती केली होती. मात्र, क्रीडा विभागाने आचारसंहितेचे कारण देऊन या स्पर्धेला बगल दिल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
कल्पेश कोळी स्मृती स्पर्धेचे महत्त्व
मुंबई क्रिकेट असोसिएशनने देशाला अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे आदी नामांकित खेळाडू दिले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षे वयोगटाखालील संघ निवडीसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या मानल्या जातात. अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, अजित आगरकर, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, संजय बांगर, वासिम जाफर व पृथ्वी शॉ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धा खेळले आहेत.
या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, यासाठी महापालिकेला पत्र दिले होते; परंतु आचारसंहिता असल्याचे कारण देऊन ही मागणी फेटाळून लावली. एका चांगल्या स्पर्धेबाबत महापालिकेची उदासीनता निराशा करणारी आहे.
- विकास साटम, समन्वयक,
क्रिकेट स्पर्धा, नवी मुंबई विभाग
उदयोन्मुख खेळाडूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असल्याने त्याच्या आयोजनासाठी महापालिकेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. परंतु आचारसंहितेमुळे यावर्षी मैदान उपलब्ध करून देण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
- रेवप्पा गुरव,
क्रीडा अधिकारी, महापालिका