कळंबोली : कळंबोली वसाहतीत मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यामुळे के.एल. १ मधील घरांमध्ये सांडपाणी येत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत वारंवार तक्रारी करूनही सिडकोकडून कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांनी मंगळवारी थेट सिडको कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी पाहणी करून त्वरित चेंबर साफ करण्यात येईल, असे सांगितले.कळंबोली परिसरात अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्या असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी घराच्या आजूबाजूलाच साचते. सेक्टर ५ ईमधील के.एल. १ येथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. बाजूच्या मलनि:सारण वाहिन्यांना गळती लागली असून त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे एकतर पाणी रस्त्यावर येते, नाहीतर घरांमध्ये झिरपत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. जिजामाता ओनर्स असोसिएशनच्या घरांत किचनमध्ये सांडपाणी साचत आहे. त्यामुळे स्वयंपाक करायचा कसा, असा प्रश्न गृहिणींनी उपस्थित केला आहे, तर काही घरांमध्ये खाटेवर बसून जेवण करावे लागते इतकी परिस्थिती बिकट आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहेच त्याचबरोबर घरात ओल येत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या जटील बनली आहे. याबाबत सिडकोकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय योजना झाल्या नाही. म्हणून महिलांनी थेट सिडको कार्यालय गाठले आणि कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांना जाब विचारले. कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष नितीन काळे, राजू बनकर, स्नेहल बागल यांनीही अधिकाºयांना धारेवर धरले. कार्यालयात थोडा वास आला तर तुम्ही रूम फ्रेशनर मारता, एसी बिघडले तर त्वरित दुरुस्त करता. मात्र, जनसामान्यांच्या आरोग्याकडे का दुर्लक्ष करता? असा प्रश्न रणवरे यांनी विचारला. जोपर्यंत अधिकारी परिसरात पाहणी करीत नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्यावर रघुवंशी यांनी के.एल-१ मध्ये जाऊन पाहणी केली आणि त्वरित चेंबर सफाईचे आदेश दिले.
कळंबोलीत घरांमध्ये शिरले सांडपाणी, मलनि:सारण वाहिन्या तुंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:54 PM