कामोठे ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार
By admin | Published: January 31, 2017 03:41 AM2017-01-31T03:41:12+5:302017-01-31T03:41:12+5:30
कामोठे ग्रामपंचायतीत नियम धाब्यावर बसवून अनेक कामे करण्यात आली आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने
कळंबोली : कामोठे ग्रामपंचायतीत नियम धाब्यावर बसवून अनेक कामे करण्यात आली आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. याप्रकरणी माजी सरपंच व उपसरपंचावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे.
सोमवारी कामोठे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. त्यावेळी ठाकूर बोलत होते. तत्कालीन कामोठे ग्रामपंचायतीने ५९,३४,३७५ रूपये खर्च करून खुर्च्या खरेदी केल्या. प्रत्यक्षात २४० रूपयांच्या खुर्चीकरिता ५०० ते ६०० रूपये मोजण्यात आले आहे. या खुर्च्या जुई गावातील आगरी समाज हॉल, तसेच राकेश गोवारी मित्रमंडळ, पोलीस ठाण्याला देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु अशा प्रकारचा हॉल त्या गावात अस्तित्वातच नाही. त्याचबरोबर मित्रमंडळ आणि कामोठे पोलीस ठाण्यात सुध्दा खुर्च्या नाहीत.
खुर्च्या खरेदीच्यावेळी ई-निविदाही काढण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नौपाडा येथे काँक्रीटीकरण करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. मात्र असे कोणतेही काम ग्रामपंचायतीने केलेले नाही. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस बजावून चौकशीचे आदेश दिल्याचा दाखलाही त्यांनी दिला. जुई येथील व्यायामशाळेतील साहित्य खरेदीतही कसा घोटाळा करण्यात आला याची माहिती देण्यात आली.
कामोठे वसाहतीत ग्रामपंचायतीच्या वतीने १०३ सोसायट्यांमध्ये विकासकामे केल्याचे ग्रामपंचायत दरबारी नोंद आहे. मात्र १८ सोसायट्यांमध्ये कोणतेही काम झाले नाही. परंतु त्यांचे बिल काढण्यात आले आहे. इतर सोसायट्यांमध्येही अर्धवट कामे राहिलेली असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
येथील शंकर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक जय हनुमान ग्रामस्थ मंडळाने स्वखर्चाने बसविले होते. त्याचे नऊ लाखांचे बिल काढून अफरातफर करण्यात आल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात आला. ग्रामपंचायतीने १५ टक्के निधी आदिवासींकरिता राखीव ठेवणे अपेक्षित असताना तो निधी इतरत्र फिरविण्यात आला असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. याआधी भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवक एम. जे. मालगुणकर यांच्यावर कारवाई झाली होती.
त्याच्याबरोबर तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या काही वर्षात जो कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला त्यामध्ये तत्कालीन सरपंच बेबीताई म्हात्रे व उपसरपंच किशोर म्हात्रे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महेंद्र भोपी यांनी केली आहे. (वार्ताहर)
भारतीय जनता पक्षाने हा आरोप हेतूपुरस्सर केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा डाव कुटील डाव आहे. ग्रामपंचायतीत त्यांचेही सदस्य होते. तसे आम्ही काही केले असते तर त्यांनी विरोध केला नसता का सरळ आणि सोपे गणित आहे. ही राजकीय स्टंट बाजी असल्याने जनतेला कोण खरे आणि खोटे हे माहीत आहे. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानभरपाईचा दावा ठोकू.
- किशोर म्हात्रे, माजी उपसरंपच, कामोठे ग्रामपंचायत