महामार्गावरील कामोठे सर्व्हिस रोड पाच वर्षांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:02 AM2019-11-10T00:02:41+5:302019-11-10T00:02:44+5:30
कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे.
कळंबोली : कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. कामोठे ते खारघरपर्यंतचा सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. यामुळे कित्येक नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्र ार करूनही दखल घेतली जात नाही.
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे ते खारघर टोलनाकापर्यंत असलेला सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. कामोठेकरांना मुंबईला जाण्यासाठी या अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. २००४ साली कामोठे सर्व्हिस रोडचे काम टीआयपीएल या कंपनीने पूर्ण केले. त्यानंतर या कंपनीकडून विजेचे खांबही बसवण्यात आले. चार दिवस दिवे पेटलेही त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यांची देखभाल न झाल्याने साडेपाच वर्षे नुसते खांब आहेत; पण यातून मिळणारा प्रकाश गायब झाला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीचे प्रकार घडत आहेत. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामोठे बसस्टॉप या ठिकाणी बाहेर गावी गेलेले रहिवासी रात्री-अपरात्री प्रवास करून उतरतात. महामार्गावर अंधार असल्याने नागरिकांना कामोठे शहरात जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कामोठे येथील सिटिजन युनिटी फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. ३१ आॅगस्टला कफ व एकता सामाजिक संस्थेबरेबर कामोठेकर नागरिकांनी उपोषण करण्याचे जाहीर करताच, सा.बा. अधिकाऱ्यांनी पथदिवे चालू करणार असल्याचे सांगताच उपोषण मागे घेण्यात आले. तीन महिने झाले तरी सार्वजनिक विभागाकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत.
>कामोठे भुयारीमार्गही बंद अवस्थेत
सर्व्हिस रोड अंधारात आहेच; पण पुणे जाणाºया महामार्गावर जाण्याकरिता बांधण्यात आलेला भुयारीमार्गही बंद अवस्थेत आहे. यात पाणी साचले आहे. या भुयारीमार्गाचा कामोठेकरांना कोणताही उपयोग होत नाही. महामार्गावरील कामोठे येथे अंधार असल्याने वाहनांना जवळ आल्याशिवाय समोरील व्यक्ती दिसत नाही, त्यामुळे महामार्ग ओलांडताना दररोज अपघात घडत आहेत. याबाबत सा.बा. विभाग दुर्लक्ष करत असून याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
>कामोठे ते खारघर सर्व्हिस रोडवरील पथदिव्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना देण्यात आले आहे. याबाबत त्यांना आम्ही सांगितले आहे. पथदिव्यांची सा.बा. ठाणे इलेक्ट्रिकल विभागाची जबाबदारी आहे.
- किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम
विभाग, नवी मुंबई