कामोठेत हुक्का पार्लरचे लोण पसरतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:59 AM2018-08-11T01:59:26+5:302018-08-11T01:59:29+5:30
कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरचे लोण पसरले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येऊन हुक्का ओढत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरचे लोण पसरले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येऊन हुक्का ओढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे तरुण पिढी बिघडत चालली असल्याचे कामोठेकरांचे म्हणणे आहे. याविरोधात नगरसेविका हेमलता गोवारी यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह, गृहराज्यमंत्री, पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन दाद मागितली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोण कामोठे वसाहतीत पोहचले आहे. खारघरहून महाविद्यालयीन तरुण-तरुणी हुक्क्याचा धूर घेण्याकरिता या वसाहतीत येतात. सायंकाळी हे पार्लर हाऊसफुल्ल होत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांचे म्हणणे आहे. सेक्टर-३५ ब्लू हेवन इमारतीत हुक्का पार्लर सुरू आहे. विशेष म्हणजे हे पार्लर पोलीस ठाण्यापासून जवळ आहे. सेक्टर-६ ए थारवानी सोसायटीतही हुक्क्याचा धूर निघतोय. तसेच सेक्टर २0 आणि २१मध्ये हुक्का पार्लर सुरू आहेत. येथेही मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला आहे, परंतु त्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आणखी काही ठिकाणी हुक्क्याचे दुकान थाटण्याचे नियोजन सुरू आहे. तरुण पिढीला चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका हेमलता रवी गोवारी या गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिका, पोलीस, कामगार उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोवारी यांनी क्र ांतिदिनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दाद मागितली आहे. त्या शिवाय अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही हुक्का पार्लरबाबत निवेदन दिले आहे. याशिवाय नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडेही तक्रार केली आहे.
>कॅफेच्या नावावर हुक्का पार्लर
दुकाने निरीक्षकांकडून त्यांना जे परवाने देण्यात आले आहेत, त्यामध्ये चहा नास्ता इतकाच उल्लेख आहे. कॅफेच्या नावाखाली येथे हुक्क्याचा धूर काढला जात असताना संबंधितांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. प्रत्येक विभाग परस्परांकडे बोट दाखवित असल्याने कामोठे वसाहतीतील वातावरण खराब होत चालले आहे.
>कामोठे शहरामध्ये जागोजागी हुक्का पार्लर सेंटर्स उघडण्यात आली आहेत. त्याकडे अल्पवयीन मुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. हुक्का पार्लरच्या आडून अनेक गैरधंदे सुरू असल्याने त्याला कायदेशीर चाप बसविणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसह विविध विभागाला निवेदन दिले आहे.
- हेमलता रवी गोवारी,
नगरसेविका,
पनवेल महानगरपालिका