कळंबोली अग्निशमन केंद्राचा झाला कोंडवाडा
By Admin | Published: January 31, 2016 02:30 AM2016-01-31T02:30:04+5:302016-01-31T02:30:04+5:30
सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाचा कोंडवाडा झाला आहे. वीज नसल्याने दोन पैकी एक इमारतीचा वापर होत नाही. एका इमारतीमध्ये चार ते पाच कर्मचाऱ्यांना रहावे लागत आहे.
- नामदेव मोरे, नवी मुंबई
सिडकोच्या कळंबोली अग्निशमन दलाचा कोंडवाडा झाला आहे. वीज नसल्याने दोन पैकी एक इमारतीचा वापर होत नाही. एका इमारतीमध्ये चार ते पाच कर्मचाऱ्यांना रहावे लागत आहे. जवानांना तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी घेवून जावे लागत असून अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विमानतळ, मेट्रो व इतर भव्य प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देणारी सिडको अग्निशमन सारख्या अतीमहत्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आहेच. परंतू जे जवान आग विझविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात त्यांनाही आवश्यक सुविधा मिळत नाहीत.
कळंबोली अग्निशमन केंद्राची मागील काही वर्षात प्रचंड दुरवस्था झाली आहे. याठिकाणी अनेक नवीन रिस्क्यू व्हॅन दिसत असल्या तरी त्यांचा वापर होत नाही. अनेक महिन्यांपासून धुळ घात आहेत. केंद्रामध्ये फक्त एकच फायर इंजीन सुस्थितीमध्ये असून इतर सर्व वाहने भंगार झाली आहेत. उपलब्ध वाहनाचा वापर करून जास्तीत जास्त सहाव्या मजल्यापर्यंतची आग विझविता येते. अग्निशमन केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दोन इमारती बांधल्या आहेत. यामधील एक इमारतीमध्ये वीजपुरवठा बंद असल्याने तीचा वापर होत नाही. एकाच इमारतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची सोय केली आहे. एका खोलीत चार ते पाच कर्मचारी दाटीवाटीने रहात आहेत. इमारतीमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना तळमजल्यावरून स्वत: इमारतीमध्ये पाणी घेवून जावे लागत आहे. येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोने पाच हजार लिटर क्षमतेचे दोन भुमीगत जलकुंभ तयार केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे तिन महिन्यातच त्यांची दुरावस्था झाली आहे. या जलकुंभाचा काहीही उपयोग होत नाही. यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंगू व मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोने अग्निशमन दलामध्ये नवीन जवानांची भरती केली आहे. तिन महिन्यापासून काम करणाऱ्या अनेक जवानांना अद्याप गणवेश दिलेला नाही. आग विझविण्यासाठी फायरप्रुप जॅकेट नाही. बुट नसल्याने चप्पल घालून आग विझविण्यासाठी जावे लागत आहे. आग विझविताना दुर्घटना होण्याचीही शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांचा आपघात विमा काढणे अत्यंत आवश्यक असते. परंतु नवीन भरती केलेल्या जवानांचा अद्याप विमा काढण्यात आलेला नाही.
अग्निशमन अधिकारी जीवावर उधार होवून काम करत आहेत. तिजोरीत करोडो रूपये असताना अग्निशमन दलामधील जवानांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी खर्च का केला जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. यापुर्वी २००५ मध्ये आग विझविताना टी. आर. घरत हा जवान शहीद झाला होता. यानंतर दहा वर्षातही काहीच सुधारणा झाल्या नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जलकुंभाच्या कामाची चौकशी करा
अग्निशमन केंद्रामध्ये एक वर्षापूर्वी प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ बसविले आहेत. तीन महिन्यात प्लास्टीकच्या टाक्या तुटल्या आहेत. वापर न होणाऱ्या या टाक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ट पाण्याच्या टाक्या बसविल्याच्या कामाची अद्याप चौकशीही केलेली नाही.
अधिकाऱ्यांना २४ तास पाणी
कळंबोली अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या सदनीकेमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. परंतू ज्या इमारतीमध्ये कोंडवाड्याप्रमाणे जवानांच्या राहण्याची सोय केली त्यांच्यासाठी गरजेपुरते पाणीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांना अनेकवेळा इमारतीच्या बाजूला असणाऱ्या नळावरून पाणी घेवून जावे लागत आहे. ही तफावत कधी दुर होणार अशी विचारणा केली जात आहे. कर्मचाऱ्यांची ही गैरसोय दुर करावी, इमारतीमधील विजपुरवठा व इतर कामे करून ती कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांना २४ तास पाणी
कळंबोली अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांच्या सदनीकेमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. परंतू ज्या इमारतीमध्ये कोंडवाड्याप्रमाणे जवानांच्या राहण्याची सोय केली त्यांच्यासाठी गरजेपुरते पाणीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांना अनेकवेळा इमारतीच्या बाजूला असणाऱ्या नळावरून पाणी घेवून जावे लागत आहे. ही तफावत कधी दुर होणार अशी विचारणा केली जात आहे. कर्मचाऱ्यांची ही गैरसोय दुर करावी, इमारतीमधील विजपुरवठा व इतर कामे करून ती कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे.
सिडकोने प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात वाहन चालक म्हणून अग्निशमन दलात भरती केले आहे. अद्याप कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले जात नाही.
प्रशासनाने नवीन भरती केली परंतू अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय दिला जात नसल्याने चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.